रूपगंध: खेळ

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई’, हे ज्ञानेश्‍वरांनी आपल्या ओव्यांमध्ये लिहून ठेवले आहे. खेळ हा शब्द महाभारतापासून असल्याचे दिसते. माऊली या खेळाला भक्‍ती रसात न्हाऊन काढतात. संपूर्ण वैष्णव या भक्‍ती रसात खेळाने न्हाऊन मन तरतरीत करा. या संदेशात टाळमृदुंगाच्या साथीने एक मार्ग दाखवतात. शंकर-पार्वतीसुद्धा सारीपाट खेळ खेळताना उल्लेख येतो. महाभारतात मुष्टियुद्ध, कुस्ती अशा खेळांचा उल्लेख आढळतो.

प्राचीन काळी राजे रजवाडे यांच्या काळात मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन केले जात असे. बैलांच्या झुंजी, रेड्यांची शर्यत, तलवारबाजी, दांडपट्टा, तिरंदाजी असे अनेक खेळ खेळले जात होते. अथेन्समध्ये खेळाची मोठमोठी मैदाने, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आजही जगाला साक्ष पटवून देत आहे. मोहेंजोदडो येथील उत्खननात अनेक वेगवेगळ्या प्रकारची खेळणी सापडली आहे.

मूल जन्माला आल्यावर काही महिन्यांच्या अवधीत तो आपले हातपाय हलवत स्वतःशीच खेळत असतो. नंतर खुळखुळाच्या ताल लयाने आनंदी होते. पांगुळगाड्याची सांगड घालत चालणे, पळणे हे सहज शक्‍य होते.थोडा मोठा झाल्यावर घोडा घोडा आघाडी, झुक झुक गाडी आगगाडी प्रमाणे झुक झुक आवाज करणे, मग त्याच्या तोंडावर कपडा टाकून भॉ करणे, हे लहान बाळ व मोठी माणसेही खेळत असतात. उद्यानात गेल्यावर घसरगुंडी, झोका, सिस्वा खेळणे, चेंडूशी, लाकडी घोड्यावर बसून तालात डोलत राहणे उपजतच खेळले जाते.

पुुढे जाऊन किल्ला बनवणे, मामाचे पत्र हरवले, कांदा फोडी, डब्बा एस्पेस, सूरपारंब्या असे कल्पकतेला वाव देणारे खेळ असत. या खेळांमध्ये महिलाही काही मागे नाहीत. बाहुलीचा, भातुकलीचा खेळ, सागर गोटे, सागरगोटे उंच फेकून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागरगोटा उचलावा, उंचच उडवलेले सागरगोटी झेलावे, त्यामध्येही पहिल्या डावाला एअरखई म्हणतात, दुसऱ्या डावाला दुर्गाई, तिसऱ्याला तीरख ई हे सागर अनेक प्रकारे खेळले जातात. हा घरात बसून कुठेही खेळला जाई.

काचापाणी या खेळात घरातल्या स्त्रियांच्या काचेच्या बांगड्याचे तुकडे घेऊन ते गोळा करणे व दुसरी काच न हलवता अलगत उचलणे हे कलाकुसरीचे खेळ असल्याने घरातील सर्व सभासद खेळत असत. यामध्ये हात, बोटे, डोळे यांचा उत्तम व्यायाम होत झेल पकडायचे. झिम्मा, फुगडी, लंगडी, लगोरी, दोरीच्या उड्या, कोंबडा, पिंगा, सुपली नाचवणे त्याबरोबर ताल लय यांची सांगड घालत वेगवेगळ्या नात्यांचे उल्लेख करत गाणं म्हणणे, मंगळागौर, नागपंचमी, हादगा, भोंडला अशा विविध सणावारांच्या अनुषंगाने खेळ व त्याबरोबरचे गाणे, जात्यावरचे गाणे, ओव्या, साभिनय खेळ असे अनेक खेळ खेळले जात असत. हे खेळ खेळत असताना हसत खेळत दैनंदिन कामेही केली जातात.

खेळातून मुलांच्या भावविश्‍वाचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ, बाहुलीचे खेळ. मुलीची आई कशी वागते हे खरं तर मनोविश्‍लेषण व्हायचे. आंधळी कोशिंबीर, लपंडाव, वाघ-शेळी यातून आपसूकच एकसंघ भावना निर्माण होत असे. डोळ्यावर पट्टी बांधल्यावर गंधाने, स्पर्शाने आपल्या आजूबाजूच्या हालचालीचा मागोवा घेत किंवा प्रतिस्पर्ध्याने आवाज दिल्यानंतर या दिशेने खेळाडूला पकडणे, हे शिकले जाते.

कबड्डी, खो-खो, विटीदांडू, रस्सीखेच यातून आवश्‍यक असणारा आत्मविश्‍वास मिळतो व काहीही बाह्य साधनांशिवाय हा खेळ खेळला जातो. बेडूक उड्या, दोन हातावर चालणे यात शारीरिक व्यायाम तर होतोच पण स्वतःचा तोल सांभाळण्याची कला आपसूकच आत्मसात होते. चमचा-लिंबू या खेळामध्ये शरीरातील सर्व अवयवांचा तालमेल साधून प्रतिस्पर्धीच्या पुढे जायचे असते.

सुई-दोरामध्ये पटकन दोरा टाकून पळणे हा तुमची एकाग्रता दर्शवणारा खेळ. पायामध्ये बारदान लटकवून उड्या मारत चालायचे किंवा दोन खेळाडूंचे एकत्र पाय बांधून लंगडी घालत एकमेकांना सांभाळत आनंद मिळवला जातो. आजच्या कॉम्प्युटर ऑनलाइन गेम मध्ये मुलांचा असा विकास होणार आहे का, तुम्हीच विचार करा.

खेळ हा आयुष्यातल्या व्यक्‍तीबरोबरही खेळला जातो. भावनिक, मानसिक कोणाचंतरी प्यादं म्हणून उपयोग करणे, कपटी, आसुरी भावनांचा उद्रेक या खेळाने किती जणांचे आयुष्य बरबाद केले. महाभारतातही सारिपाठ हरल्यानंतर घडलेल्या घटना या सर्वश्रुतच आहे. या खेळण्याच्या अनुषंगाने कित्येक जणांना आपल्या भावना शब्दात मांडताना काव्याची निर्मितीही झाली. जसे की, “खेळ मांडला…’ तर कधी कवी लाडिक शब्दांद्वारे “खेळ खेळू आपण दोघेजण’.
आपले जीवनही एक खेळ आहे.

-जोत्स्ना पाथ्रीकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.