मध्ययुगीन मानसिकता असणाऱ्या देशांमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी ही सर्वसामान्य बाब. इराणसारखा देश यामध्ये नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच तेथे चित्रपटांसह अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अभिनेत्रींसाठी नवा फतवा जारी करण्यात आला आहे. यानुसार सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोके झाकणे बंधनकारक केले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या अभिनेत्रींना काम करण्यास मनाई केली आहे. या आदेशाविरुद्ध अभिनेत्रींनी एल्गार पुकारला आहे. आधुनिक काळात जग प्रगतीच्या आणि विकासाच्या नव्या संधींचा शोध घेत पुढे जात असताना महिलांसाठीची रुढीवादी बंधने गळून पडत आहेत. अशा काळात इराणसारखा देश जर स्त्रियांना बंदिस्त ठरवण्यासाठी दंडुकेशाहीचा वापर करत असेल तर आजवरच्या इतिहासाप्रमाणे याला जबर उत्तर दिले जाईल यात शंका नाही.
इराणमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी ही सर्वसामान्य बाब. चित्रपटांसह अन्य ठिकाणी काम करणाऱ्या नायिकांसाठी इराणने नवा फतवा जारी केला आहे. यानुसार सार्वजनिक रूपातून वावरताना डोके झाकणे बंधनकारक केले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या नायिकांना काम करण्यास मनाई केली आहे. पण या आदेशाविरुद्ध नायिकांनी एल्गार पुकारला आहे. अर्थात इराणमधील सामान्य महिलांना मात्र याची जबर किंमत मोजावी लागत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस इराणच्या “मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड इस्लामिक गाइडन्स’ने सरकारचे आदेश न पाळणाऱ्या अभिनेत्रींची नावे जाहीर केली असून त्यांना काम करण्यास बंदी घातली आहे. या नायिका अनेक ठिकाणी डोक्याला स्कार्फ न बांधता फिरताना दिसल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे.
मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे मंत्री मोहंमद मेहदी इस्माईल यांनी आदेशाचे समर्थन करताना म्हटले, ज्या नायिका हिजाब कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांना काम करणे शक्य नाही. या यादीत वीस जणांची नावे असून त्यात प्रसिद्ध अभिनेत्री तरानेह अलीदुस्तीचा देखील समावेश आहे. 39 वर्षीय अलीदुस्ती प्रसिद्ध नायिका मानली जाते. तिने परकी चित्रपटांच्या श्रेणीतील ऑस्कर जिंकणारा द सेल्समन (2016) मध्ये काम केले आहे. अलीदुस्ती ही प्रारंभीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी हिजाबचे पालन करत असे. मात्र गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये महसा अमीनीचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण बदलले आणि त्यानंतर इराणच्या दडपशाहीला जबदरस्त विरोध सुरू झाला.
22 वर्षीय महसा अमीनीला इस्लामिक ड्रेस कोडचे पालन न केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. त्यानंतर तिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. यानंतर इराणच्या महिला रस्त्यावर उतरल्या. जगभरातही त्याचे पडसाद उमटले. या आंदोलनात अभिनेत्री अलीदुस्ती देखील सामील झाली होती. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि त्यात तिने हेडस्कार्फ घातलेला दिसत नाही. तिचे 80 लाख फॉलोअर आहेत. या फोटोत तिच्या हातात इराणी महिला हक्क आणि सरकारविरोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक कागद झळकवलेला दिसतो. या कागदावर महिला, आयुष्य आणि स्वातंत्र्य असे लिहले आहे. हा फोटो पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच अलदुस्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांनी तिची सुटका करण्यात आली. सोशल मीडियावर तिने आपल्याला काम करण्यास अडथळे आणले जात असल्याचा उल्लेख केला आहे. आपण हेडस्कार्फ घालणार नाही कारण त्याला अजूनही माझ्या बहिणींचे रक्त लागले आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.
इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोके न झाकणे हे जीवावर बेतणारे राहू शकते. आणखी एक वाईट उदाहरण म्हणजे 17 वर्षीय अर्मिता गारावंदचा मृत्यू. अर्मिता ही हिजाब न घालता शाळेत जात होती. त्याचवेळी मोरेलिटी पोलिसांनी तिच्यावर हल्ला केला. मेट्रोतून प्रवास करताना झालेल्या हल्ल्यात ती बेशुद्ध पडली. डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. काही काळ कोमात राहिल्यानंतर अर्मिताला ब्रेनडेड म्हणून घोषित केले. 29 ऑक्टोबर रोजी तिचा दफनविधी करण्यात आला.
इराणी महिलांचा संताप
राजधानी तेहरानमध्ये राहणाऱ्या एका इराणी विद्यार्थिनीने सांगितले, “आम्ही आमचे आयुष्य दररोज धोक्यात घालून जगत आहोत. कारण आम्ही स्कार्फ न घालता बाहेर पडतो. पण इराण सरकारच्या भीतीपोटी काही नायिका अजूनही स्कार्फ घालत असून ही बाब दुदैंवी आहे.’ तिला आपल्या बोलण्यातून इराणमध्ये नुकताच घडलेल्या आणखी एका दुर्दैवी घटनेची आठवण करून द्यायची होती. तिचा अंगुलीनिर्देश हा इराणी दिग्दर्शक दारिउश मेहरजुई आणि त्यांची पत्नी पटकथाकार वाहदीदेह मोहंमदफार यांच्या अंत्ययात्रेकडे होता. ऑक्टोबरच्या मध्यात दोघेही राहत्या घरात चाकू हल्ल्यात जखमी झाल्याच्या अवस्थेत सापडले होते. या घटनेने चित्रपट उद्योग आणि सर्वसामान्य हादरले. अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण चोरीचे होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला.
या हल्ल्यात बागकाम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. अनेक निर्मात्यांप्रमाणेच मेहरजुई देखील इराण सरकारशी या नियमावरून वाद घालत असत. मार्च 2022 मध्ये या 83 वर्षीय दिग्दर्शकाने रागाच्या भरात इराणच्या सांस्कृतिक मंत्रालयाला एक संदेश लिहिला. “मला मारून टाका, माझे जे वाटोळे करायचे आहे, ते करून टाका, पण मला माझा अधिकार हवाय.’ अखेर नको हवे ते घडले. चाकूहल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक नायिकांनी हेडस्कार्फ घातला. केवळ एका मुलीने हिजाब मानण्यास नकार दिला आणि ती म्हणजे दिवंगत जोडप्याची 16 वर्षांची कन्या मोना मेहरजुई.
विरोधाची जबर किंमत
इराणची अभिनेत्री शोले पाकरावन म्हणतात, “तरुण पिढी आमच्यावर नाराज आहे आणि हे आम्ही जाणून आहोत. माझी पिढी परंपरावादी आहे आणि खूपच सजग आहे.’ पाकरावन या 2017 पासून जर्मनीत राहात आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांची मुलगी रेहाने जब्बारी यांना इराणमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारण तिने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा खून केला होता. शोले पाकरावन यांनी मुलीला वाचवण्यासाठी बराच संघर्ष केला. मात्र त्या यशस्वी ठरल्या नाहीत. आता त्या दुसऱ्यांसाठी आवाज बुलंद करत आहेत. त्या म्हणतात, सध्या इराणमध्ये विरोधाची जबर किंमत मोजावी लागत आहे. आपण बेपत्ता होऊ इच्छित नसाल तर आपल्याला इच्छा नसतानाही हेडस्कार्फ घालावाच लागेल. सरकारकडून दडपशाही केली जात असली तरी इराणमध्ये विरोध मावळल्याचे त्यांना वाटत नाही. हा एक बदला असून तो अन्य रूपातूनही समोर येऊ शकतो. मागच्यावर्षी जे काही घडले, ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. आता त्यांचा मुकाबला तरुण आणि धाडसी मुलींच्या पिढीशी आहे. स्वातंत्र्य मिळवताना दडपशाहीचा अंत करायचा आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.
– विनिता शाह