2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती.. त्यामुळे सहज काही वर्षापूर्वीची आगाखान पॅलेस भेट आठवली.तिथल्या इतिहास दर्शना पेक्षा येणारा प्रत्येक जण त्या ऐतिहासिक जागे कडे कसे बघत होता? याची मजा घेतली त्याचे हे वर्णन.
मी चंदन नगरला एकटीच गेले होते कामा साठी सकाळीच..काम लवकर झाले .. अक्टिवा वर होते येताना आगाखान पॅलेस बघायला थांबले.. ..माझ्या सारखीला ते दोन तास सोलो ट्रीप चा आनंद देऊन गेले..नाहीतरी मी कधी जाणार एकटी कुठे.. पुण्यातल्या पुण्यातच मग ही सोलो ट्रीप. आत जाताना तिकीट काढले. बऱ्या पैकी गर्दी होती..जाताना कॅमेरा साठी वेगळे तिकीट असे लिहिले होते..मला कळेना मोबाईल कॅमेरा असताना वेगळा कॅमेरा का नेतील लोक..आत गेल्यावर कळले कारण..भव्य आगाखान पॅलेस त्याच्या हिरव्या लॉन वर एक प्रेग्नान्सी शूट चालू होते तर पायऱ्यावर प्री वेडिंग शूट.. कोणी राजकुमार वेशातील तो, राजकुमारी वेशातील तिला पायरी वरून फुल देत होता..कोणी मागच्या बाजूला गुडघ्या वर बसून तिचा हातात हात घेत होता .3..4 शूटस तरी चालू दिसले.त्यांच्या दृष्टीने ही जागा फक्त एक योग्य साईट होती…परदेशी टुरिस्ट आवर्जून आगाखान पॅलेस बघायला येतात. पुण्यात तश्या व्यवस्थित राहिलेल्या प्रेक्षणीय वास्तू कमीच राहिल्यात. त्यामुळे ते येतात..ते हा प्रकार विचित्र नजरेने बघत होते..
आतले प्रदर्शन फोटो ऐतिहासिक पण त्याचे नव्याने जतन केले पाहिजे . फोटो खराब व्हायला लागले आहेत. मुले आणि त्यांचे पालक त्यांना भारावून इतिहास सांगत होते..ती मोठ्या डोळ्यांनी तो इतिहास समजून घेऊन कल्पनेत बघत होती..गांधींची रोज वापरातली खोली तर नक्कीच भारावून टाकते..त्यांचा स्पर्श जाणवतो तिथे..
मग गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा आणि वयक्तिक सचिव महादेव भाईंची समाधीची जागा बघितली..शांत एकदम..दोन संगमरवरी तुळशी वृंदावन होते..परदेशी टुरिस्ट कौतुकाने बघत होते.. चिमण्या बागडत होत्या तिथे, खूप दिवसांनी बघितल्या..परदेशी पर्यटकांना त्यांच्या बरोबरचा गाईड काही म्हणाला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाईट झाले…मेंटेनन्स संबंधी काही अभिमानास्पद नसलेले म्हणाला असावा..
काही गोष्टी विक्रीला होत्या..गांधींजींची पुस्तके काही खादी ग्रामोद्योगची उत्पादने पण ठेवली होती..चंदन उदबत्ती आणि एक छोटे पुस्तक घेतले. गांधीजींनी आफ्रिकेतून येताना बोटीवर लिहिलेले पहिले पुस्तक. परदेशातून येताना भारता बद्दल केलेले चिंतन होते ते. आगाखान पॅलेसचे स्मृती चिन्ह झाले माझ्याकडे स्थानिक भारतीय असून. ते परदेशी लोकांनी स्मृती चिन्हं घ्यावी म्हणून होते खरे तर..
भूक लागली होती ..कॅन्टीन मध्ये गेले.ते अगदी स्वच्छ आणि चविष्ट होते..बाकी काही नाही तर तिथला बटाटे वडा खाण्यासाठी आवर्जून जावे असे..तसा विचार करून तिथे येणारे बरेच कॉलेजियन्स असावेत.
मग टॉयलेट ..एकदम क्लीन बहुतेक परदेशी पर्यटक येतात म्हणून असेल पण बिलकुल पाणी सांडलेले नव्हते.. लग्नाळू मुली प्री वेडिंग शूटचे छान कपडे तिथे निवांत बदलत होत्या.. मेक अप करत होत्या म्हणजे बघा..
मग मस्त लॉन मध्ये एकटीने बसून थोडा वेळ वातावरण एन्जॉय केले ..माझ्या शेजारी तिथले सुरेख स्केचेस काढणारा चित्रकार तरुण होता..मी मात्र फोटो काढले..तो दुमजली देखणा शुभ्र पांढरा, प्रशस्त पॅलेस आणि सभोवताली हिरवळ राजेशाही आहे खरा. मग अखेर निघाले. माझी स्वतःसाठीची वेळ संपली.
जाताना एक परदेशी तरुण तिकिटाच्या रांगेत उभा होता..सहज वाटले त्याला विचारावे त्याला काय माहित आहे गांधीजी बद्दल..
तो बेल्जियन होता जॉन नावाचा.. अल्फा लावल कंपनी मध्ये काम करत होता . 6 महिने पुण्यात होता..त्याला आगाखान पॅलेस माहित होता आणि त्याच्या शालेय पुस्तकात भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल थोडे होते..त्यामुळे त्याला गांधीजी माहित होते.. आणि मी त्याला बेल्जियन न म्हणता जर्मन म्हणाले त्याचा त्याला निश्चित राग आला…त्याच्या देशाचे नाव सोडून मला काहीच माहीत नव्हते आणि तेही मी चुकीचे घेतले..
डॉ सुनीता बागवडे