‘रुपी’ला पहिल्या तिमाहीत चांगला नफा

पुणे – विलिनीकरणाच्या दृष्टीने आवश्‍यक सर्व प्रक्रिया रुपी बॅंकेने पूर्ण केल्या असून राज्य सहकारी बॅंकेने विलिनीकरण कार्यवाही लवकरच पूर्ण करावी, अशी मागणी रुपीच्या प्रशासकीय मंडळ सदस्यांनी केली आहे. दरम्यान, रुपी बॅंकेने पहिल्या तिमाहीअखेर 3 कोटी 54 लाख रुपयांचा परिचालनात्मक नफा मिळविला आहे.

बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. बॅंकेने ड्यू डिलिजन्सची प्रक्रिया पूर्ण केली असून, विशेष तपासणी अहवाल राज्य बॅंकेकडे सादर झाला असावा, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांची प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांनी भेट घेऊन विलिनीकरणाची कार्यवाही लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. या प्रक्रियेत रुपी बॅंकेच्या ठेवीदारांचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासन मंडळ प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बॅंकेने 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत समाधानकारक कामगिरी केली आहे. बॅंकेच्या 1294 कोटी 21 लाख रुपयांच्या ठेवी असून, कर्जे 306 कोटी 22 लाख रुपयांचे आहे, असेही सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.