नवी दिल्ली – आता डिसेंबरपर्यंत देशभरात डिजिटल चलन सुरू करणार असल्याचे आरबीआयने नुकतेच स्पष्ट केले आहे. मग रुपया बंद होईल का, असा प्रश्न निर्माण होतो. मुळात डिजिटल चलन म्हणजे काय? तसेच डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सीपेक्षा कसे वेगळे आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
डिजिटल चलन काय आहे?
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC हे रोख रकमेचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. या डिजिटल चलनाचे पूर्ण नाव सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असे आहे. याचा अर्थ, तुम्ही जसे रोख व्यवहार करता, त्याचप्रमाणे तुम्ही डिजिटल चलन व्यवहार देखील करू शकाल.
हे देशाची सेंट्रल बँक जारी करीत आहे. ते त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदात देखील समाविष्ट होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते देशाच्या सार्वभौम चलनात रूपांतरित केले जाऊ शकते. भारतात याला डिजिटल रुपया म्हणता येईल.
डिजिटल चलनाचे दोन प्रकार आहेत. एक किरकोळ (रिटेल) आणि दुसरा घाऊक(होलसेल). रिटेल डिजिटल चलनाच्या स्वरूपात असेल. होलसेल डिजिटल चलन वित्तीय संस्थांद्वारे वापरले जाईल.
डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये काय फरक?
डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये मोठा फरक आहे. डिजिटल चलनाला देशाच्या सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे यात कोणताही धोका नाही. त्याचे सार्वभौम चलन म्हणजेच त्या देशाच्या चलनामध्ये रूपांतर करता येते. क्रिप्टोकरन्सीसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.
‘या’ देशांमध्ये चालते डिजिटल चलन
चीन, जपान आणि स्वीडनमध्ये डिजिटल चलनावर चाचणी सुरू झाली आहे. तर यूके, अमेरिका देखील डिजिटल चलन आणण्याच्या विचारात आहेत. इक्वेडोर, बहामास, ट्युनिशिया, सेनेगलमध्ये डिजिटल चलन वापरले जात आहे.