Rupee Symbol । राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या त्रिभाषिक सूत्रावरून तामिळनाडू आणि केंद्र यांच्यातील वाद इतका वाढला की, द्रमुक सरकारने त्यांच्या बजेट लोगोमधून रुपयाचे असणारे देवनागरी चिन्ह ‘₹’ काढून टाकले आहे. त्याठिकाणी तमिळ अक्षर ‘ரூ’ वापरला. मात्र, हे रुपयाचे चिन्ह प्रत्यक्षात तामिळनाडूतील एका माणसाने डिझाइन केले होते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती स्वतः द्रमुक पक्षाची आहे.
सध्या आयआयटी गुवाहाटी येथे प्राध्यापक असलेले डी. उदय कुमार यांनी रुपया चिन्हाची रचना केली. त्यांचे वडील तामिळनाडूमध्ये द्रमुकचे माजी आमदार होते. आता जेव्हा उदय कुमार यांना स्टॅलिन सरकारच्या या निर्णयावर त्यांचे मत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी स्वतःला या वादापासून पूर्णपणे दूर थेट यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
‘ते राज्य सरकारवर अवलंबून..” Rupee Symbol ।
एका वृत्तसंस्थेशी बोलताना उदय कुमार यांनी, ‘यावर माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही. जर सरकारला वाटत असेल की बदल आवश्यक आहे आणि त्यांना ते त्यांच्या स्वतःच्या स्क्रिप्टने बदलायचे असेल तर ते ते करू शकतात. ते राज्य सरकारवर अवलंबून आहे. याबद्दल मला काही म्हणायचे नाही.” असे म्हणत या मुद्द्यापासून स्वतःला लांब ठेवले आहे. तसेच त्यांनी, “तामिळनाडू आणि द्रमुकशी संबंधित असलेल्या एखाद्या व्यक्तीने हे तयार केले हा केवळ योगायोग होता.” असे म्हटले आहे.
२०१० मध्ये चिन्हाची निर्मिती Rupee Symbol ।
१५ जुलै २०१० रोजी भारत सरकारने सध्या वापरात असलेले रुपयाचे चिन्ह अधिकृतपणे स्वीकारले. भारत सरकारने एक स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये उदय कुमारची रचना सर्वोत्तम मानली गेली. यानंतर ते रुपयाचे नवीन चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. उदय कुमार यांचे वडील एन धर्मलिंगम हे ऋषिवंदियम मतदारसंघातून द्रमुकचे आमदार आहेत. धर्मलिंगमला चार मुले होती. उदय कुमार हा त्यांचा दुसरा मुलगा होता. उदयचा जन्म १९७८ मध्ये चेन्नई येथे झाला. त्यांनी अण्णा विद्यापीठातून पदवी आणि नंतर आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.