Rupee record low: डॉलरसमोर रुपया पुन्हा गडगडला; इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणे
Rupee record low: डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी घसरून विक्रमी नीचांकी 95.73 वर (तात्पुरता) स्थिरावला.

Rupee record low: मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय रुपयाची घसरण गुरुवारीही कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी घसरून विक्रमी नीचांकी 95.73 वर (तात्पुरता) स्थिरावला. (Rupee record low)
आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपयाची सुरुवात 95.74 वर कमजोर झाली. दिवसभरात डॉलर-रुपया विनिमय दराने 95.61 ते 95.96 या सर्वकालीन नीचांकी पातळीपर्यंत हालचाल केली. बुधवारी रुपया 95.66 वर बंद झाला होता, तर व्यवहारादरम्यान त्याने 95.80 ची विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती.
रूपया घसरण्याची कारणे – (Rupee record low)
चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील अडथळ्यांमुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन आयात महागली असून महागाईच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर रुपया यंदा आशियातील सर्वाधिक घसरण झालेल्या चलनांपैकी एक ठरला असून, वर्षभरात त्यात 6 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली आहे.
मिराए अॅसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, अमेरिकेतील वाढती महागाई लक्षात घेता फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यता कमी झाल्या आहेत. त्यामुळे डॉलर मजबूत होत असून त्याचा दबाव रुपयावर कायम आहे. तसेच अमेरिका-इराण तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली भांडवली माघारही रुपयासाठी प्रतिकूल ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Rupee record low: डॉलरसमोर रुपया पुन्हा गडगडला; इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणे
रिझर्व्ह बँकेकडून होणारा हस्तक्षेप तसेच सोने-चांदीवरील आयात शुल्कवाढ रुपयाला काही प्रमाणात आधार देऊ शकते, असेही चौधरी यांनी सांगितले. त्यांच्या मते, डॉलर-रुपया विनिमय दर 95.50 ते 96.10 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डॉलर निर्देशांक 98.51 वर जवळपास स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर 0.50 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 106.16 डॉलरवर पोहोचला.
शेअर बाजारात तेजी – (Rupee record low)
देशांतर्गत शेअर बाजारात मात्र तेजीचे वातावरण राहिले. सेन्सेक्स 789.74 अंकांनी वधारून 75,398.72 वर बंद झाला, तर निफ्टी 277 अंकांच्या वाढीसह 23,689.60 वर स्थिरावला. मात्र, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी 4,703.15 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
दरम्यान, ऊर्जा किमतींतील वाढीमुळे एप्रिल महिन्यातील घाऊक महागाई दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर 8.3 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली आहे. मार्चमध्ये हा दर 3.88 टक्के होता, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो 0.85 टक्के होता.





