Rupee hits record low : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, महागाईची चिंता आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाची घसरण शुक्रवारी आणखी तीव्र झाली. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया प्रथमच डॉलरमागे ९६ चा टप्पा ओलांडत ९६.१४ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. दिवसअखेर मात्र रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे काहीशी सावरणारी स्थिती निर्माण झाली आणि रुपया ९५.८६ प्रति डॉलर या नव्या विक्रमी बंद पातळीवर स्थिरावला. यंदाच्या वर्षात रुपयाने आतापर्यंत सहा टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली आहे. गेल्या सहा व्यवहार सत्रांतच रुपया जवळपास दोन टक्क्यांनी कमजोर झाला आहे. इराण युद्धाच्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने रुपयावरील दबाव अधिक वाढला आहे. हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांचे 1.67 लाख कोटी रुपयांचे नुकसान अमेरिकेतील मजबूत किरकोळ विक्रीचे आकडे आणि स्थिर रोजगार बाजारामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे डॉलर निर्देशांक ०.३४ टक्क्यांनी वाढून ९९.१५ वर पोहोचला. त्याचवेळी ब्रेंट क्रूडचे दर वधारून प्रति बॅरल १०९.०४ डॉलरवर गेले. तज्ज्ञांचे मत – (Rupee hits record low ) चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक अनिश्चितता, भारतीय बाजारातील तुलनेने उच्च मूल्यांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील मोठ्या गुंतवणूक संधींचा अभाव आणि कमकुवत थेट विदेशी गुंतवणूक (FDI) यामुळे भांडवली प्रवाहावर परिणाम होत आहे. वाढत्या तेलदरांमुळे महागाईचा धोका वाढत असल्याने रुपयावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. Rupee hits record low : डॉलरसमोर रुपया प्रथमच 96.14 वर; विक्रमी घसरणीने बाजारात चिंता दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारातही घसरण झाली. सेन्सेक्स १६०.७३ अंकांनी घसरून ७५,२३७.९९ वर बंद झाला, तर निफ्टी ४६.१० अंकांनी घसरून २३,६४३.५० वर स्थिरावला. एप्रिल महिन्यात भारताची निर्यात १३.७८ टक्क्यांनी वाढून ४३.५६ अब्ज डॉलरवर पोहोचली, तर आयात १० टक्क्यांनी वाढून ७१.९४ अब्ज डॉलर झाली. त्यामुळे व्यापार तूट २८.३८ अब्ज डॉलरवर गेली. मिराए अॅसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, “कच्च्या तेलाच्या उच्च किमती, महागाईची चिंता, मजबूत डॉलर आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी संभाव्य विक्री यामुळे रुपयावर दबाव कायम राहू शकतो. मात्र, रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप आणि सोने-चांदीवरील आयात शुल्कवाढ रुपयाला काही प्रमाणात आधार देऊ शकते. डॉलर-रुपया विनिमय दर ९५.६० ते ९६.२० या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.”