मुंबई – इतर सर्व चलनाच्या तुलनेत डॉलर वधारत आहे. त्याचबरोबर खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत रुपयाच्या मूल्यावरील दबाव वाढत आहे. बुधवारी रुपयाचा दर पुन्हा आठ पैशांनी कोसळून 84 रुपये 76 पैसे या नव्या निचांकी पातळीवर गेला.
चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, रुपया आणखी कोसळला असता. मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून शेअर बाजारात खरेदी झाली. त्याचबरोबर शेअर बाजार निर्देशांक वाढल्यामुळे रुपयाची घसरण काही प्रमाणात कमी झाली. जगातील प्रमुख सात चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.11 टक्क्याने वाढून 106.47 वर गेला आहे.
खनिज तेलाच्या किमती 0.83 टक्क्यांनी वाढून 74.23 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेल्या आहेत. या दोन्ही घटनाक्रमाचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 3,664 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यामुळे रुपयाला थोडाफार आधार मिळाला. अन्यथा रुपयाचा दर आणखी कमी होण्याची भीती होती.