मुंबई – भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक आकडेवारी बाहेर येत आहे. अशातच अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ब्रिक्स सदस्य देशांना डॉलरशिवाय इतर चलन व्यापारासाठी वापरल्यास 100 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अगोदरच बळकट होत असलेला डॉलर आणखी बळकट झाला आहे. परिणामी इतर चलनांबरोबरच भारतीय रुपयाच्या मूल्यातही मोठी घट झाली.
सोमवारी रुपयाचे मूल्य 13 पैशांनी कोसळून 84.73 रुपये प्रति डॉलर या निचांंकी पातळीवर गेले. यामुळे भारताला आयात महागात पडून महागाई आणखी वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, भारताची निर्यात कमी होत आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक बाहेर देशात जात आहे. या सर्व बाबींचा रुपयांच्या मूल्यावर परिणाम होत आहे.
शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 4,383 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या अगोदर चीन, मेक्सिको आणि कॅनडाला अधिक आयात शुल्काचा धमकी दिली होती. त्यानंतर आता भारतासह रशिया,चीन आणि इतर ब्रिक्सच्या सदस्यांना धमकी दिली आहे. यामुळे चलन बाजारात संदिग्धता निर्माण झाली आहे. डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स पुन्हा वाढून 106.27 अंकावर गेला आहे.
हा निर्देशांक डॉलरची इतर सहा प्रमुख चलनाशी तुलना करून तयार करण्यात येत असतो. सुदैवाने खनिज तेलाच्या किमती अजूनही 72 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आहेत. त्यामुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळाला. जर खनिज तेलाच्या किमती परिस्थितीजन्यकरणामुळे वाढल्या तर रुपयाचे मूल्यावर आणखी दबाव येऊ शकतो. रुपया घसरत असल्यामुळे अगोदरच भारताकडील परकीय चलन साठा कमी होत असून सरलेल्या आठवड्यामध्ये हा साठा 17 अब्ज डॉलरने कमी होऊन 657 अब्ज डॉलरवर गेला आहे.