मुंबई – अगोदरच डॉलर वधाारत असल्यामुळे दोन महिन्यापासून रुपयाचे मूल्य बरेच कमी झाले आहे. आता अमेरिकेने रशियाच्या खनिज तेलावर वाढीव निर्बंध घातल्यामुळे खनिज तेलाचे दर भडकले आहेत. अशा अवस्थेत खनिज तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करणार्या भारताला महाग खनिज तेल आयातीसाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. अशा परिस्थितीत सोमवारी रुपयाचा भाव 58 पैश्यानी कोसळून 86 रुपये 62 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला.
त्यातच अमेरिकेत रोजगार वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत अमेरिका यावर्षी कमी प्रमाणात व्याजदर कपात करणार आहे. यामुळे डॉलर बळकट राहणार आहे. सध्या इतर मुख्य सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.29 टक्क्यांनी वाढून 109.80 अंकावर गेला आहे. डॉलर बळकट होत असल्यामुळे अमेरिकन कर्जरोख्यातील गुंतवणूक वाढत असून अमेरिकेच्या दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा 0.48 टक्क्यांनी वाढून 4.19 टक्क्यावर गेला आहे. हा गेल्या दोन वर्षातील उच्चांक आहे.
त्यामुळे भारतासह इतर वेगाने विकसित होणार्या देशातील गुंतवणूक अमेरिकन कर्जरोख्यात जात असल्याचे दिसून येत आहे. याचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होणार आहे. शुक्रवारी रुपयाचा भाव अठरा पैशांनी कोसळला होता. रुपयाचा भाव मोठ्या प्रमाणात कोसळत असूनही रिझर्व बँकेने फारसा हस्तक्षेप केल्याचे दिसून येत नाही.
त्यामुळे रिझर्व बँक रुपयाचे मूल्य खालच्या पातळीवर स्थिर ठेवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक परवडत नसल्यामुळे हे गुंतवणूकदार ऑक्टोबर महिन्यापासून भारतातून विक्री करीत आहेत. शुक्रवारी या गुंतवणूकदारानी 2,254 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. दरम्यान या घटनाक्रमाचा भारतातील परकीय गंगाजळीवर परिणाम होत आहे. 3 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 5.6 अब्ज डॉलरने कमी होऊन 634 अब्ज डॉलरवर गेला.