पिंपरी -रांगोळीतून साकारलेली गणरायाची विविध रूपे पाहण्याची अनोखी संधी पिंपरी-चिंचवडकरांना मंगळवारपासून (दि. 3) मिळणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील कलादालनात या रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
येथील अंशुल क्रिएशन्स या संस्थेच्या वतीने आयोजित मुंबईतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार नंदू शिंदे यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून येत्या 3 ते 8 सप्टेंबरपर्यंत विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे.
अष्टविनायकाची आठ रूपे, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ, अखिल मंडई गणपती, मुंबईतील लालबागचा राजा, सिद्धिविनायक, कोकणातील गणपतीपुळेचा गणपती, चिंचवड येथील मोरया गोसावी आदी गणपती रूपांच्या 20 भव्य रांगोळ्या या प्रदर्शनात आहे. प्रत्येक रांगोळी आठ फूटाची असून 26 किलो रांगोळी यासाठी वापरण्यात आली असल्याची माहिती अंशुल क्रिएशनचे विजय जगताप यांनी दिली