पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिनी म्हणून परिचीत असलेल्या मनसे पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षात होत असलेल्या त्रासावर आपली भूमिका स्पष्ट केली. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
राजकारणात स्त्रीला टार्गेट केलं जात. तेच आता मनसेत माझ्याबाबत घडू लागले आहे. मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा अजिबातच विचार नाही. पण मला या रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं.
2017 मध्ये मला भाजपची खुली ऑफर होती. त्यानंतर 2019 मध्ये आमदारकीचं तिकीट कापलं गेलं. तरी पक्ष सोडला नाही. महापालिका निवडणुकीत माझा पराभव झाला. तरी मला 15 हजार मतं पडली होती. त्यानंतरही मी थांबले नाही. मात्र पक्षातील काही लोक माझ्या विरोधात राज ठाकरेंचे काऩ भरतात. त्यांची नावे, डेटा माझ्याकडे आहे. मात्र एकदा माझी तार हलली की नक्कीच नाव जाहीर करणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आपण शरद पवार आणि अजितदादांना मध्यंतरी भेटलो होतो. त्यांना भेटणं चुकीचे नाही. अजित पवार पालकमंत्री आहेत. पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांनाच भेटणार. उद्या मी शिवसेनेच्या नेत्याला भेटल्याचा फोटो टाकल्यावर मी शिवसेनेत जाणार असच म्हणणार का? असा सवाल रुपाली यांनी उपस्थित केला.
दरम्यान आपण मनसे सोडण्याचा कोणताही विचार केला नाही. आपण राज ठाकरे यांना पाहूनच पक्षात आलोय. मात्र पक्षात होणारा त्रास असाच राहिला तर मला एकतर राजकारण सोडावं लागेल. अन्यथा लोकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी हिच लोक मला पर्याय शोधायला लावतील, असा सूचक इशाराही रुपाली पाटील यांनी दिला.