पुणे : नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना केलेल्या विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे.
प्रचार सभेत भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेत दखल घेतली आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पध्दतीने विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं, असा इशाराचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
तसेच, एखाद्या गोष्टीची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणं, हे संस्कार आणि संस्कृती अतिशय नीचपातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देतात, हे चुकीचं आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.