पुणे – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. मात्र चित्रा वाघ यांच्या टीकेची साधी दखल देखील रुपाली चाकणकर यांनी घेतलेली दिसत नाही.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मला कोणतीच प्रतिक्रिया यावर द्यायची नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद बाबत मला कोणतीच कल्पना नाही आहे. तसेच अध्यक्षपदाबाबत अधिकृत कोणतेही पत्र किंवा घोषणा नाही त्यामुळे याबाबत अधिक काही बोलणार नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
वाढत्या अत्याचाराच्या घटनावरती एकत्रीत येवून काम करण गरजेच असून त्यासाठी महाविकास आघाडी सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्याबरोबर प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया पथक स्थापण केलं असून त्या द्वारे आपण महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. असे यावेळी चाकणकर यांनी सांगितले आहे. दरम्यान चित्रा वाघ यांच्या टीकेची दखलही चाकणकर यांनी घेतली नसल्याचे दिसून आले आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ
”महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.”