पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा हा किमयागार प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. “आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडता ऋतू आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे पावसात भिजण्याची एकही संधी रूपाली भोसले सोडत नाही. दरवर्षी मित्रमंडळींसोबत बॅंड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं, मक्याचं कणीस खाणं हा तिचा ठरलेला बेत असतो. सध्या लॉकडाऊनमुळे हे करणं किंवा हा आनंद घेणे शक्य नाही. मात्र, मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरू असल्यामुळे सेटवरच तिने पावसाचा आनंद घेतला आहे.
रूपाली म्हणाली, मी विरारला राहते. माझ्या बाल्कनीत तर मी छोटीशी बागच तयार केली आहे. पावसाळ्यात तर येथील नजारा मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. याच दरम्यान मोगऱ्याला बहर येतो. घरभर पसरणारा मोगऱ्याचा सुवास मन मोहित करून टाकतो.
यंदा तर माझ्या आईने काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. विरारला राहात असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे अनुभवता येते. पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे हे मला खूप आवडते.
त्यामुळे पाऊस माझ्या खूप जवळचा असल्याचे तिने सांगितले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत नुकतंच संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसलेने तिच्या फिटनेसचे रहस्य सांगितले.