युवकांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची धावपळ 

नितीन साळुंखे
नागठाणे  –जिल्ह्यात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. परिणामी उमेदवारांनी गठ्ठा मतदान मिळण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. यात निर्णायक ठरणाऱ्या तरुण मंडळांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

तरुणाईला आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुपटीने ऑफर दिली जात आहे. तर युवकांमध्येही “मिळतंय तर सोडायचं कशाला’ अशी परिस्थिती असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात संथ असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता गती घेतली आहे. दुरंगीची अपेक्षा असणाऱ्या कराड उत्तर मतदारसंघात तीन मातब्बर रिंगणात राहिल्याने प्रत्येक मतासाठी घसघशीत सुरू झाली आहे. चार तालुक्‍यात विभागलेल्या या मतदारसंघाच्या त्या-त्या परिसरात असणाऱ्या तरुण मंडळांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

या यंत्रणेतर्फे मंडळांच्या प्रमुखांना बोलावून पाठिंब्यासाठी ऑफर दिली जात आहे. प्रत्येक मंडळांची असणारी ताकद, कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन वाटाघाटी होत आहेत. मुळातच निवडणुकीत मंडळांच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी परंपरेप्रमाणे यापूर्वीच काही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केली आहेत. मात्र बहुतांश मंडळातील त्या पाठिंब्याबाबत मतभेद निर्माण झाले आहेत. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी परंपरा सोडून जो आपल्याला अधिक आर्थिक मदत करेल त्यालाच पाठिंबा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंडळांची ज्येष्ठ आणि तरुणाई अशा दोन गटात सरळ विभागणी झाली असल्याचे पहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.