इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ गटाचे नेते नवाझ शरीफ हे पाकिस्तानात परतणार असल्याची अफवा आज पसरली होती. नवाझ शरीफ परतणार असल्याच्या वृत्तामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरील आव्हाने वाढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
खैबर पख्तुनवा प्रांतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तारुढ “पीटीआय’ पक्षाला मोठा धक्का बसल्यामुळे या पक्षाची लोकप्रियता घसरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच इम्रान खान यांच्याविरोधात बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी एक आघाडी स्थापन केल्यामुळे इम्रान खान अडचणीत आले आहेत.
अलिकडेच नवाझ शरीफ यांचे बंधू आणि “पीएमएल-एन’ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी नवाझ शरीफ इतक्यात परदेशातून परतणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. प्रत्यार्पणाच्या खटल्यातील आव्हान याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत नवाझ शरीफ यांचे ब्रिटनमध्येच कायदेशीर वास्तव्य असणार आहे, असे शाहबाझ शरीफ यांनी म्हटले होते.
नवाझ शरीफ वैद्यकीय उपचारांसाठी ब्रिटनमध्ये गेले आहेत. ते पूर्ण बरे झाल्यावर आणि डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिल्यानंतरच ते परत येतील, असेही शाहबाझ शरीफ म्हणाले होते.