पुणे – मंगळवार पेठ येथील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.
कमला नेहरू रुग्णालयात चार संशयित फिरत असल्याची माहिती एका नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडे आधार कार्ड सापडले असून ते सध्या लोहिया नगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच रुग्णालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. तसेच बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या नागरिकांना काही वेळ बाहेर थांबवण्यात आले.