टोमॅटोच्या शिवारात अफवांचे पीक

जुन्नर तालुक्‍यावर आर्थिक अरिष्ट : व्हायरसच्या अफवेने उत्पादक जेरीस

बेल्हे- अफवांच्या गर्तेत सापडलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी अजून उभारी घेतली नाही. त्यापाठोपाठ टोमॅटो पिकावरील वनस्पतिजन्य विषाणूचा करोना विषाणूशी संदर्भ जोडून चुकीची व दिशाभूल वृत्त प्रसारित झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. जुन्नर तालुक्‍यातील पोल्ट्री, टोमॅटो उत्पादकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आला आहे.

जुन्नर तालुक्‍यातील टोमॅटोचा तोडणी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. इतर भाजीपाला पिकाप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून टोमॅटोवर जिवाणू व विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, हे नैसर्गिक आहे. वनस्पतिजन्य विषाणूचा व करोना विषाणूशी कोणताही सबंध नसताना चुकीचे वृत्त प्रसारित करण्याचा सपाटा समाजविघातक प्रवृत्तीकडून लावला जात आहे. त्यात ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे भीतीची छाया निर्माण झाली आहे.

विषाणूच्या अफवेमुळे टोमॅटोच्या मागणीत घट होऊन शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. करोना व नैसर्गिक संकटामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. मार्केटमध्ये व्यापारी टोमॅटो घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावा लागत आहे. कांद्यासारखे टोमॅटो साठवून ठेवता येत नाही. व्यापारी मागेल त्या भावाने शेतकऱ्यांना टोमॅटो विकावा लागत आहे. करोना, अवकाळी, आता व्हायरसची अफवा आदी कारणामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात “दुष्काळात तेरावा महिना’ आला आहे.

चार एकर उन्हाळी टोमॅटो लागवड केली होती. यासाठी भांडवल व मजुरी खर्च 3 लाख रुपये आला. टोमॅटोवर व्हायरस असल्याच्या अफवांमुळे 50 रुपयांप्रमाणे दर मिळाल्याने फक्‍त 2 लाख 40 हजार रुपये उत्पादन झाले आहे. यावर्षी माझे किमान 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी लागवड केलेल्या टोमॅटोचा दुप्पट नफा झाला होता. परंतु अफवांमुळे पी सोढडून देण्याची वेळ आली आहे. उत्पादन खर्च सुद्धा मिळाला नाही.
-अशोक बढे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, नगदवाडी.

टोमॅटोवरील विषाणूचा करोना विषाणूशी संदर्भ जोडणे चुकीचे आहे. मागील वर्षी सुद्धा टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तीन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील टोमॅटो फळांचे नमुने घेऊन तपासणीसाठी बंगलोर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
-सतीश शिरसाट, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर.

हंगामामध्ये टोमॅटोला दरवर्षी दोनशे रुपयांच्या आसपास भाव असतो. परंतु या अफवेमुळे 50 ते 60 रुपये टोमॅटोला बाजारभाव आहेत. टोमॅटो मातीमोल किमतीने शेतकरी विकत आहेत. खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. टोमॅटो संबंधित चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्याविरोधात कारवाई करावी.
– संजय भुजबळ, अध्यक्ष जुन्नर तालुका शेतकरी संघटना.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×