येरवडा (प्रतिनिधी) – येरवड्यात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर सोमवारी सकाळी १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येरवड्यासह पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
येरवडा परिसरातील सुमारे २० ते २५ लोकांची तपासणी करण्यात आली असून अद्याप इतर एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. त्यापूर्वी येरवडा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयाची तपासणीसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्याला सर्दी,ताप,खोकला अशी लक्षणे आढळून आल्यामुळे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. रविवारी त्याला कोणाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सध्या”त्या” रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांसह परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस नागरिकांची देखील ताबडतोब नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
सुदैवाने अद्याप यातील एकाही रुग्णाला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे यांनी दिली. येरवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती समजताच “अफवांचे पेव फुटले” आहे. “सतरा रुग्णांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाला असून सर्वांनी खबरदारी घ्यावी” असा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करण्यात आला आहे. या चुकीच्या मेसेज मुळे येरवड्यासह संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून हाच चुकिचा मेसेज इतर अनेक ग्रुपवर लोकांनी खात्री न करतापुढे फॉरवर्ड केला आहे. त्यामुळे
नागरिकांची दिशाभूल होत असून मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाला.
येरवडा परिसरातील लोकवस्ती दाट असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव जलदगतीने
वाढू शकतो .त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे
मात्र असे असूनही अनेक नागरिक घराच्या बाहेर फिरताना दिसत असून घोळक्याने
चौकात बोलत बसलेले असतात.पपोलीस आल्यानंतर तात्पुरते जातात मात्र पुन्हा
आहे तसेच दृश्य दिसते.या लोकांनी वेळीच सरकारने दिलेल्या नियमांचे पालन
ना केल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल