चंडिगढ – हरियाणातील जिल्हा परिषद निवडणुकांत सत्तारूढ भाजपची पीछेहाट झाली. त्या पक्षाला लढवलेल्या 100 पैकी केवळ 22 जागांवर विजय मिळवता आला. ती सुमार कामगिरी भाजपच्या दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे.
हरियाणात 22 जिल्हा परिषदांच्या 411 जागांसाठी निवडणुका झाल्या. अपक्ष उमेदवारांनी सुमारे 350 जागांवर बाजी मारली. कॉंग्रेस आणि भाजपचा मित्र असणाऱ्या जननायक जनता पक्षाने पक्षचिन्हांच्या आधारे त्या निवडणुका लढवल्या नाहीत. मात्र, भाजप आणि आपच्या चिन्हांवर प्रत्येकी 100 उमेदवार त्या निवडणुकांना सामोरे गेले.
पक्षाचा विचार करता भाजपपाठोपाठ आपने 15 जागा जिंकल्या. त्यामुळे आप हरियाणात बस्तान बसवत असल्याचे सूचित झाले. त्या राज्यात आणखी दोन वर्षांनी विधानसभा निवडणूक होईल. मात्र, तेथील स्थिती भाजपसाठी पोषक राहिली नसल्याचेच जिल्हा परिषद निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे.
Adani Port Protests : अदानींच्या प्रकल्पाला विरोध; केरळमध्ये जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला
कॉंग्रेसने तर जनतेने नाकारल्याने भाजपला हरियाणात सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत 87 टक्के मतदार अपक्ष आणि कॉंग्रेसला मानणाऱ्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहिले. भाजपला केवळ 5 टक्के मते मिळाली, असा दावाही कॉंग्रेसने केला.