जाधववाडी (वार्ताहर)- करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या परिसरात लॉकडाऊनमध्ये काही अटीशर्थींवर शिथिलता आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ शहरातील केशकर्तनालय बंद होते. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत केशकर्तनालयांना काही अटीशर्थींवर परवानगी देण्यात आली आहे.
केशकर्तनायलयांत नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे करोनाचे संकट वाढण्याचा धोका आहे. नागरिकांना पैसे देऊनही सुविधा मिळत नाहीत. लॉकडाऊननंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. केस कापण्यासाठी दोनशे रुपये तर दाढीसाठी शंभर रुपये इतका दर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये व शहरात ठिकठिकाणी केशकर्तनालय सुरू केले आहेत. परंतु त्यांच्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. केशकर्तनालयामध्ये एका वेळेस केवळ एका व्यक्तीला केस कापण्याकरिता बसण्यास परवानगी दिली आहे. त्या व्यक्तीस स्वतंत्र ऍप्रोन देण्यात येणार आहे. एकदा वापरलेला कपडा पुन्हा वापरता येणार नाही. दुसऱ्या व्यक्तीस नवीन ऍप्रोन देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या नंतर सर्व वापरलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करून पुन्हा दुसऱ्या व्यक्तीस वापरले जाणार आहे, अशी सूचना नाभिक संघटनेचे अध्यक्ष नसीम शेख यांनी केली आहे. हे ऍप्रोन सर्व नाभिक स्वखर्चाने आणणार असून, ऍप्रोनची किंमत वीस रुपये आहे. असे काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांबाबत नागरिकांमध्ये जागृतता आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव होण्यास मदत होऊ शकते.
नियमांचे होतेय उल्लंघन
एका वेळेस एक व्यक्तीला परवानगी असताना काही ठिकाणी एका वेळेस तीन व तीनपेक्षा अधिक जण दुकानामध्ये असलेले पाहण्यास मिळत आहेत. तर काही ठिकाणी अतिशय शिस्तबद्धतीने सर्व नियमांचे पालन केले जात आहे.
नागरिकांना नाभिकांचे आवाहन
करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःचे नॅपकिन व टॉवेल केशकर्तनालयामध्ये येताना बरोबर आणण्याचे आवाहन व्यावसायिकांनी केले आहे. यास ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी नागरिक स्वतःहून सुरक्षिततचे नियम पाळताना दिसून येत आहेत. स्वयंशिस्त पाळली तर करोनाला पळवून लावता येईल, असे जाधववाडी येथील नाभिक समीर शेख यांनी प्रभातशी बोलताना मत व्यक्त केले.