नियम…! लग्न, सार्वजनिक कार्यक्रमांची सीडी पोलिसांना द्या

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : करोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्हाभर भरारी पथके

पुणे – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने लग्न आणि इतर खासगी कार्यक्रमांसाठी फक्त 200 व्यक्तींनाच परवानगी आहे. विवाह समारंभाचे व्हिडिओ चित्रीकरण सीडी पाच दिवसांत जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काढले आहे.

खासगी समारंभ-कार्यक्रमांत करोना प्रतिबंधाचे सर्व नियम व अटी पाळल्या जातात की नाही, हे तपासण्यासाठी भरारी पथके नेमण्यात येणार आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीत करोना बाधित रुग्णांचे वाढता संसर्ग लक्षात घेता त्यावर तत्काळ प्रतिबंध आणि रुग्णालयीन व्यवस्थापन अधिक बळकट करुन करोना बाधितांचे मृत्यू टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिक कठोर झाले आहे.

काही गावांमध्ये लग्न समारंभामुळे करोनाचे रुग्ण वाढल्याचे आढळून आले. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रमांना मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहत असून नागरिक करोनाविषयक सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेज. राज्य शासनाच्या सूचना व नियमांचे पालन करणार असल्याचे हमीपत्र मंगल कार्यालय मालकांना द्यावे लागणार आहे.

असे आहेत नियम
– लग्न समारंभासाठी पोलिसांची परवानगी आवश्‍यक
– सर्वांना मास्क बंधनकारक
– प्रवेशद्वाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाइल क्रमांक व स्वाक्षरी घेण्यात यावी.
– ऑक्‍सिमीटर, इन्फ्रा थर्मामीटरचा वापर करण्यात यावा. हॉल वारंवार निर्जंतूक करावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.