अतिसंक्रमणशील क्षेत्रातील सर्व बॅंकांच्या शाखा बंद राहणार
इतर ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत ग्राहकांसाठी तर, दुपारी 2 ते 5 अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी वेळ
पुणे – लॉकडाऊन तीनमधील काही अटी शिथिल करून काही व्यवसायांसह इतर सेवांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामध्ये बॅंका सुरू करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबाबत एक नियमावली पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अतिसंक्रमणशील क्षेत्र व अतिसंक्रमणशील क्षेत्र वगळून अशी नियमावली आहे.
अतिसंक्रमणशील क्षेत्रातील सर्व बॅंकांना त्यांच्या शाखा बंद ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, त्यांना त्यांची एटीएम सेंटर चालू ठेवता येणार आहेत. अपरिहार्य कारणे, शासकीय अनुदान यासंबंधीत कामकाजासाठी शासनाच्या आदेशाचे पालन व्हावे, असादेखील उल्लेख आहे. तर संक्रमनशील क्षेत्रातील वरील भाग वगळता इतर (नॉन कन्टेन्मेंट परिसर)मधील बॅंक ग्राहकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. त्यानंतर दुपारी 2 ते 5 पर्यंत अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना बॅंका सुरू ठेवता येतील.
कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या 50 टक्के कर्मचारी कामावर हजर राहू शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नॉन कन्टेन्मेंट क्षेत्रामधील शाखेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे कन्टेन्मेंट क्षेत्रामध्ये वास्तव्यास असणारे नसावेत. दरम्यान, ज्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कमल 188 नुसार कारवाई होणार आहे.
असे असणार नियम
– बॅंक परिसरात गर्दी टाळण्यासाठी खासगी व मान्यताप्राप्त सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक.
– आरोग्यविषयक सर्व खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य.
– बॅंक आस्थापना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायंकाळी 7 पर्यंत वास्तव्याच्या ठिकाणी पोहचणे.
– बॅंक प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत संबंधीत कर्मचाऱ्यांना द्यावी.
– सर्व संबंधितांनी अधिकृत ओळखपत्र व आदेशाची प्रत जवळ बाळगावी.