Silver News: केंद्र सरकारने चांदीच्या आयातीबाबत मोठा निर्णय घेत चांदीला ‘प्रतिबंधित श्रेणी’त टाकले आहे. त्यामुळे आता चांदी आयात करण्यासाठी व्यापारी व कंपन्यांना केंद्र सरकारचा परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. आतापर्यंत चांदीचा आयात व्यवहार ‘फ्री कॅटेगरी’मध्ये होता. नव्या नियमांनुसार चांदीच्या सळया, अनगढी चांदी, अर्ध-प्रक्रियायुक्त चांदी तसेच पावडर स्वरूपातील चांदीच्या आयातीसाठीही सरकारी मंजुरी आवश्यक राहणार आहे. देशातील वाढत्या सोने-चांदी आयातीमुळे व्यापार तुटीवर वाढता ताण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. आयात शुल्कातही मोठी वाढ काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली होती. १३ मेपासून सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आले आहे. तर प्लॅटिनमवरील शुल्क ६.४ टक्क्यांवरून १५.४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले. सोन्याच्या आयातीवरही निर्बंध सरकारने सोन्याच्या आयातीवरही नवे नियम लागू केले आहेत. अग्रिम मंजुरीद्वारे आता जास्तीत जास्त १०० किलो सोनेच आयात करता येणार आहे. पहिल्यांदाच आयात परवाना मागणाऱ्या व्यापाऱ्यांच्या युनिटची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून कारखान्याची क्षमता आणि कार्यस्थितीची तपासणी अधिकाऱ्यांकडून केली जाईल. आयातीत मोठी वाढ सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात भारताचा सोने आयात खर्च ८२ टक्क्यांनी वाढून ५.६२ अब्ज डॉलरवर पोहोचला. तर चांदीची आयात १५७ टक्क्यांनी वाढून ४१.१ कोटी डॉलर झाली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सोन्याची आयात मूल्याच्या दृष्टीने विक्रमी ७१.९८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे, चांदीच्या आयातीतही सुमारे १५० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.