सावरदरीत रणरागिणींचा रुद्रावतार

हॉटेल व्यवसायाच्या आडून सुरू असलेलला दारुअड्डा केला उद्‌ध्वस्त

शिंदे वासुली-सावरदरी गावामध्ये एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यालगत एअर लिक्विड चौकात हॉटेल व्यवसायाच्या आडून सुरू असलेला अवैध दारूअड्डा परिसरातील रणरागिणींनी एकत्र येऊन उद्‌ध्वस्त केला. पोलीस कारवाईची वाट न बघता या धंदेवाल्याची महिलांनी पळता भुई थोडी केली. काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एमआयडीसीच्या चिंचवड विभागाच्या वतीने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे नुकतीच काढून टाकली होती. मात्र चौकात मुख्य रस्त्यालगत एमआयडीसीच्या जागेवर गुप्ता नावाच्या एकाने अतिक्रमण करुन ‘गरीब माणूस आहे, पोट भरु द्या’ अशी भूलथाप मारुन सावरदरीकरांच्या डोळ्यात धूळफेक करीत हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली बेकायदा देशी दारू व्यवसाय राजरोसपणे सुरू केला. काही दिवसांपूर्वी हा व्यवसाय बंद करण्यासाठी येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी ठणकावून सांगितले असता त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. येथील काही स्थानिकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले व्यवसाय एमआयडीसीने कारवाई करत उखडून टाकल्याने संतापलेल्या महिला व नागरिकांनी बाहेरील व्यक्ती असूनही, अवैध दारू धंदा करीत असूनही कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी कुणालाही न जुमानता पुन्हा व्यवसाय सुरू करतो, या व अशा कारणांमुळे येथील महिलांनी रौद्र रूप धारण केले.

दरम्यान आजच महाळुंगे पोलीस चौकीत सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील व पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी या दारू धंद्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याच दरम्यान येथील महिला व ग्रामस्थांनी हा दारु धंदा उद्‌ध्वस्त केला. सहायक आयुक्त आर. आर. पाटील व पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट-3चे सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस नाईक यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी पोहोचून दारुधंदा कायमचा बंद झाला असल्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)