वनतळ्यात खडखडाट

उन्हाच्या झळा : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती 
वनक्षेत्राच्या हद्दीतील वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर 

तळेगाव दाभाडे –पार्श्‍वनाथ प्रज्ञालय जैन मंदिराजवळील वनपरीक्षेत्र हद्दीतील वन तळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने तळ्यात पाणी नसल्याने वन्यजीवांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून प्रसंगी वन्यजीव नागरी वस्तीत तसेच महामार्गावर आल्याने त्यांचा बळी जात आहे. या परिसरातील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या वन तळ्यातील साचलेला गाळ काढून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यजीव मित्रांनी केली आहे. या वनपरीक्षेत्राच्या हद्दीत गिलीरीसिडीया, मोह, काजू, वावळा, रक्‍तरोहीडा, सायर, रिठा, हिरडा, आवळा, उंबर, चाफा, बेहडा, कुबळ, अंजनी, करवंद, तोरण आदी जातींच्या फळ व वनौषधी झाडांचे घनदाट जंगल असून, या वनक्षेत्रात मोर, लांडोर, सांबर, भेकर, पिसोरा, रानडुक्‍कर, रानमांजर, खवले मांजर, तरस, सायाळ, कोल्हे, लांडगे, माकड, वानर, ससा, गिधाड, मोरघार, रान कोंबडे आदी वन्यजीव वास्तव्यास आहेत.

या वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पार्श्‍वनाथ प्रज्ञालय जैन मंदिराजवळ वन तळे बनविण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून वन तळ्यात गाळ साचल्याने या तळ्यात पाणी साचत नसल्याने वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या वनक्षेत्राच्या उत्तर दिशेला जुना पुणे-मुंबई महामार्ग, तर दक्षिण दिशेला द्रुतगती पुणे-मुंबई मार्ग असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मार्गावर येतात. त्यात अनेक वन्यजीवांचा बळी जात आहे.

ओझर्डे हद्दीत द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 11 मार्च 2017 रोजी मृत्यू झाला. तर 23 ऑक्‍टोबर 2018 अहिरवडे हद्दीत पुणे-मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाला. अशा अनेक वन्यजीवांचा दैनंदिन मृत्यू होण्याच्या घटना होत आजेत. कुत्रे किंवा जनावरे असल्याचे समजून नागरिक दुर्लक्ष करतात. वनविभागाकडून वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी येतो, पण तीव्र उन्हाळ्यात वनक्षेत्राच्या हद्दीत वन्यजीवांसाठी पिण्याचे पाणी नसल्याने वन्यजीवांची भटकंती सुरू असते.

वनविभागाकडून वनक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर वनतळे खोदण्यात आले असून कोणत्याही वनतळ्यात पाणी उपलब्ध नसल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी परवड होत आहे. पाण्याच्या शोधात नागरी वस्ती व महामार्गावर आल्याने त्यांचा बळी जात असून वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वनक्षेत्राच्या हद्दीतील वन तळ्यातील साचलेला गाळ काढून वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यजीव मित्र निलेश गराडे, सोमा भेगडे, अतुल वायकर, दिनेश पगडे, हरीश दानवे, शरद मोरे आदींनी केली आहे. मावळ तालुक्‍यातील वनक्षेत्रातील हद्दीतील पाण्याच्या तळ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. तळ्यामध्ये पाणी नसल्याने वनप्राण्यांचा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. याशिवाय पाण्याअभावी अनेक प्राण्यांची प्रजाती नष्ट होण्याची भीतीही पाणीप्रेमी व्यक्‍त करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.