पुणे -परिवहन विभागाच्या खात्यांतर्गत परीक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर 22 ते 24 जानेवारी या कालावधीत वाहन पासिंग आणि लायसन्स चाचणीची कामे होणार नसून, अर्जदार आणि वाहनधारकांना दिलेल्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मोटार वाहन विभागातील सेवाप्रवेशोत्तर आणि सेवाअर्हता परीक्षा या कालावधीत होणार आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बहुतांश अधिकारी परीक्षार्थी म्हणून परीक्षेत सहभागी होणार आहेत. तर, उर्वरित अधिकारी हे परीक्षा प्रक्रिया राबविण्याच्या कामकाजासाठी नियुक्त केले आहे.
दिवे कार्यालय, आळंदी रस्ता आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) येथील कामकाजात 22 ते 24 जानेवारीदरम्यान बदल होणार आहे. 22 जानेवारी रोजीच्या अपॉइंटमेंट 30 जानेवारी रोजी होणार असल्याने संगणकीय बदल झाला नसल्याने, रविवारी (30 जानेवारी) योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दिवे येथे वाहन आणावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.
याप्रमाणे होणार बदल
दिवे -22 जानेवारीऐवजी 30 जानेवारी आणि 24 जानेवारीऐवजी 5 फेब्रुवारी
आळंदी रस्ता -24 जानेवारीऐवजी 29 जानेवारी
आयडीटीआर -24 जानेवारीऐवजी 29 जानेवारी