आरटीओ पेपरलेसचा फक्‍त “फुगवटा’

भ्रष्टाचारमुक्‍त आणि पारदर्शी कारभारही फक्‍त तोंडदेखला

– संजय कडू

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात सप्टेंबर 2014 पासून टप्प्याटप्प्याने ऑनलाइन कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी दलालांचा त्रास वाचेल, कारभार भ्रष्टाचारमुक्‍त होईल आणि पारदर्शकता येईल, असे सांगण्यात आले. मात्र, जवळपास सर्व कामकाज पेपरलेस होऊनही कार्यालय दलाल मुक्‍त झालेले नाही आणि पारदर्शकताही आलेली नाही. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसह संयुक्‍त कारवाई करून दलालांवर छापेमारी केली. यामुळे पुन्हा कार्यालय आणि दलालांचे साटेलोटे चर्चेत आले आहे.

“आरटीओ’चे बहुतेक कामकाज ऑनलाइन वाहने ट्रांन्सफर, ऍथोराईजेशन आदी काही मोजकीच कामे एजंटमार्फत होतात. येथे दररोज 4 ते 5 हजार नागरिक विविध कामकाजांसाठी येतात. मात्र, अद्यापही पूर्ण सेवा ऑनलाइन झाली नसल्याने बहुतेकांना अडचणी येतात. नेमका याचाच फायदा परिसरात बसलेले दलाल उचलतात.

ऑनलाइन फॉर्म भरुन देण्यापासून अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे देऊन काम करून घेण्यासाठी हे दलाल मनमानी पैसे घेतात. नागरिकांनाही सासत्याने फेरे मारण्यापेक्षा त्यांच्याकडून काम लवकर होईल असे वाटते. यामुळे ते पैसे देऊन काम करण्यास प्राधान्य देतात. यामुळे “आरटीओ’चे कामकाज ऑनलाइन असूनही दलालांचा वावर आणि त्यांची दहशत मात्र कायम आहे. नागरिकांनी ऑनलाइन अर्ज व माहिती भरल्यावरही त्यांना हार्डकॉपी घेऊन कार्यालयात द्यावी लागते. यामुळे ऑनलाइन कामकाज असूनही कागदपत्रे गोळा करून कार्यालयात नेऊन देण्याचे काम वाचत नाही.

लॅपटॉप घेऊन कार्यालय परिसरातच ठाण
पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात जवळपास 1 ते दीड हजार दलाल आहेत. कामकाज ऑनलाइन झाल्याने त्यांनीही आपल्या कामकाजात बदल केला आहे. आता लॅपटॉप घेऊनच परिसरात बसलेले दिसतात. “आरटीओ’ची माहिती नसलेले त्यांच्या जाळ्यात अडकतात. कामकाजासाठी ऍडव्हान्स पैसे आणि कागदपत्रे त्यांच्याकडून घेतली जातात.

अनेक दलाल पैसे आणि कागदपत्रे घेतल्यावर गायब होतात. स्वत:चा फोन काही दिवस बंद ठेवतात. संगमब्रीज येथे नागरिकांची फसवणूक करणारे आळंदी येथील कार्यालयात काही दिवस ठाण मांडून बसतात. यामुळे नागरिकांना पैसे आणि कागदपत्रे गेल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. तर अनेकदा हे दलाल अधिकाऱ्यांच्या टेबलाजवळ कामकाज घेऊन घुटमळताना दिसतात. कामच झाले नाही तर दबाव टाकून धमकी देण्यापर्यंतचेही अनेक प्रकार येथे घडले आहेत.

एजंटची पोलिसांकडून झाडाझडती
“आरटीओ’ परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून अनेक एजंटांची झाडाझडती घेतली. पोलीस व “आरटीओ’तील अधिकाऱ्यांनी संयुक्‍तरित्या ही मोहीम हाती घेतली होती. बनावट कागदपत्राच्या आधारे विविध परवाने काढून देणाऱ्या एजटांची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही छापेमारी करण्यात आली. दरम्यान, गेल्या महिन्यात अपर पोलीस आयुक्‍त गुन्हे अशोक मोराळे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांच्या पथकाने शिवाजीनगर कोर्ट परिसरात बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस जामिनदाराची टोळी जेरबंद केली होती.

बनावट कागदपत्रांद्वारे लाखोंचे कर्ज
शहरातील एका तरुणाच्या कागदपत्राच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकारदेखील समोर आला होता. जेव्हा बॅंकेचे कर्मचारी घरी आले तेव्हा आपल्या नावावर दुसऱ्याच व्यक्‍तीने कर्ज घेऊन आर्थिक गंडा घातल्याचे त्याला समजले. कित्येकदा आपण अनेक कामांसाठी आपली कागदपत्रे एजंट किंवा अन्य व्यक्‍तीच्या ताब्यात देतो.

“आरटीओ’चे कामकाज ऑनलाइन आहे. तसेच, नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पडेस्कही आहे. यामुळे नागरिकांनी दलालांची मदत न घेता थेट कार्यालयात येऊन स्वत:चे कामकाज करून घ्यावे. नागरिकांना आमचे अधिकारी सर्वोपतरी मदत करत असतात. गुन्हे शाखेने कारवाईसाठी आमच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली होती. यामुळे कारवाई कशासंदर्भात आणि कोणावर केली याची माहिती गुन्हे शाखेकडूनच मिळेल.
– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.