जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातून ‘आरटीओ’ला लाखोंचा महसूल

पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड कार्यालय परिसराला जप्त केलेल्या वाहनांनी गराडा घातला होता. या वाहनांचा अखेर मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लिलाव करण्यात आला. जप्त केलेल्या व कायदेशीररित्या नोटीस बजावलेल्या एकूण 51 वाहनांचा लिलाव करण्यात येणार होता. मात्र, त्यापैकी केवळ 24 वाहनांचाच लिलाव झाला. यातून आरटीओ कार्यालयाला 25 लाख 4 हजार शंभर रुपये मिळाले तर, 7 वाहनामालकांनी 13 लाख 51 हजार 268 रुपयांचा कर भरणा करुन वाहने सोडवून नेली. अशा प्रकारे “आरटीओ’ला एक़ूण 38 लाख 55 हजार 368 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. 20 वाहनांना योग्य मूल्य न मिळाल्याने त्यांचा लिलाव होऊ शकला नाही.

आरटीओ कार्यालयाकडून कागदपत्रात त्रुटी, अबकारी कर व विविध नियमांचे उल्लंघन केल्याने या वाहनांची जप्ती करण्यात आली होती. अशा वाहनांची संख्या पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील उपप्रादेशिक कार्यालयात झपाट्याने वाढत होती. यामुळे कार्यालय परिसरात वाहन चाचणी ट्रॅकला व इतर कामासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे संबधित वाहन मालकांना कायदेशीर नोटीस बजावून लिलाव करण्याच्या हलचाली सुरु झाल्या होत्या.

लिलावासाठी 51 वाहने ठेवण्यात आली होती. मात्र, त्यापैकी सात वाहन मालकांनी लिलावाआधीच आपली वाहने कर भरणा करुन सोडवून नेली तर, उर्वरीत 44 वाहनांपैकी 24 वाहनांचाच गुरुवारी (दि.11) लिलाव झाला. या सर्व वाहनांच्या लिलावातून व सोडवून नेलेल्या वाहनांचा महसूल मिळून कार्यालयाला 38 लाख 55 हजार 368 रुपयाचा महसूल मिळाला आहे. तर, त्यापैकी 20 वाहनांना योग्य मोबदला मिळत नसल्याने त्या वाहनांचा लिलाव होवू शकला नसल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तरी, उर्वरीत वाहने व उपनगर परिसरातून पोलीस स्थानकात जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव येत्या दोन महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.