वाहनांची कागदपत्रे 30 जूनपर्यंत रिन्यु करता येणार

केंद्रिय परिवहन विभागाचा निर्णय सर्व राज्यांना बंधनकारक

मुंबई – सहसा आर्थिक वर्ष संपत आले की, आपली विविध कागदपत्रे नूतनीकरण करुन घ्यावी लागतात. विमा पॉलिसी, बॅंक फिक्‍स डिपॉझिट्‌स यासह अनेक महत्त्वाच्या कादपत्रांची वैधता 31 मार्चला संपत असते. हीच गोष्ट वाहनांच्या विविध कागदपत्रांनाही लागू होते.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना वाहन कागदपत्रांची वैधता संपल्याने तणावात असलेल्या वाहनधारकांना आता दिलासा मिळाला आहे. वैधता संपलेल्या वाहन कागदपत्रांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कोरोना काळातील ही पाचवी मुदतवाढ ठरली आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये वैधता संपलेल्या लायसन्स, परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र आणि अन्य वाहन कागदपत्रांना यापूर्वी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्राने मुदतवाढीचे नवे आदेश नुकतेच काढले आहेत.

दिनांक 1 फेब्रुवारी 2020 ते 30 जून 2021 या काळात वैधता संपलेली वाहन कागदपत्रे 30 जूनपर्यंत वैध मानण्यात यावी, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. हे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू राहणार आहेत, असे केंद्राने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.