पुणे, दि. 1 -पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) शहरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या बाईक टॅक्सीवर कारवाईला सुरुवात केली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात व्यवसाय करणाऱ्या 51 दुचाकींवर कारवाई करत त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरात ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून नागरिकांना बाईक टॅक्सीची सुविधा दिली जाते. ही सेवा अनधिकृत असून, यापूर्वी देखील आरटीओकडून अशा बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात आली आहे.
बाईक टॅक्सी करणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांनी उच्च न्यायालयात महाराष्ट्रात हा व्यवसाय करणार नसल्याचे म्हटले आहे. तरीही त्यांनी त्यांचे ऍप बंद केलेले नाही. त्यावरून शहरातील नागरिक अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. याबाबतच्या तक्रारी आरटीओकडे येत होत्या. त्यामुळे आरटीओने सोमवारी मोहीम राबविली. या ऍपवर डमी ग्राहकाच्या मदतीने बुकींग केले. त्यानंतर कारवाई केली. दिवसभरात आरटीओने वेगवेगळ्या भागांतून 51 जणांना पकडून त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
शहरात अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू होती. ही सेवा बंद करण्यासाठी विविध संघटनांनी मागणी केली होती तसेच शासनाच्या निर्देशानुसार या कारवाईला सुरुवात केली आहे. यापुढे ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे.
-अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी