दि.11 ते 29 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई) शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी दि.11 ते 29 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. मार्चमध्ये प्रवेशासाठी एकाच लॉटरी काढण्यात येणार असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांएवढीच विद्यार्थ्यांची प्रतीक्षायादीही जाहीर करण्यात येणार आहे.
…तर निवड रद्द होणार
कागदपत्रं तपासणीत अपात्र ठरणाऱ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. या संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून दाद मागण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणी करावी, असा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.
ही कागदपत्रे आवश्यक
निवासी पुरावा, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, एस.ई.बी.सी. प्रवर्ग, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा प्रवेशासाठी सादर करावा लागणार आहे. सन 2018-19 व 2019-20 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पगार स्लिप, तहसीलदारांचा दाखला, कंपनीचा दाखला गृहीत धरण्यात येणार आहे. पालकांनी अर्ज भरताना सिंगल पॅरेंटचा पर्याय निवडल्यास विधवा, घटस्फोटिताची आवश्यक कागदपत्रेही दाखल करणे बंधनकारक आहे.
प्रवेशासाठी आवश्यक सूचना
“आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांसाठी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्र शाळांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करावा
त्यानंतर सन 2020-21 च्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत करता येणार
नवीन शाळांनीही पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
लॉटरीद्वारे प्रवेश मिळणाऱ्या पालकांना गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीसाठी पडताळणी समितीकडे जाण्यास व शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास 16 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत मुदत