शाळा नोंदणीची अद्याप सूचनाच नाही : 25 टक्के राखीव जागा
पिंपरी – आर्थक दुर्बल व मागास प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यासाठी 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रियेविषयी महापालिकेच्या शिक्षण विभागाला अद्याप कोणतीच सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे, यावर्षीही आरटीईची प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वंचित, दुर्बल घटकांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत दरवर्षी डिसेंबर महिन्यात शाळा नोंदणीला सुरुवात होते. पंरतु गेल्या वर्षीपासून ही प्रक्रिया उशिरा होत असल्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरही तरी प्रवेशाच्या फेऱ्या सुरुच राहत होत्या. मागील वर्षीही ही प्रक्रिया शाळांच्या नोंदणी प्रक्रियेला मार्च महिन्यात सुरुवात झाली होती. त्यामुळे, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरु होती. आता यावर्षीही डिसेंबर महिन्याचा पूवार्ध उलटला तरी अद्याप शाळा नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याविषयी महापालिकेच्या शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे, येत्या वर्षीही आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात 172 शाळांमधून तीन हजार जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठी सुमारे 22 हजार पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यापैकी तब्बल एक हजार जागा शिल्लक राहिल्या होत्या. जागा रिक्त राहिल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीही पूर्ण प्रवेश होवू शकले नव्हते. आता यावर्षी पुन्हा शाळा नोंदणीप्रक्रिया लांबल्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे. दरम्यान शिक्षण विभागातील विविध प्रक्रियामधील डाटा अपलोडिंगचे काम सुरु असल्यामुळे शाळा नोंदणी प्रक्रिया लांबली असल्याचे अधिकारी सांगत आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदेश प्राप्त न झाल्यास आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार हे निश्चित आहे.
मागील वर्षीच्या शाळा राहणार कायम
मागील वर्षी नोंदणी झालेल्या शाळा यावर्षीही कायम करण्यात येणार आहेत. यातील केवळ अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करणाऱ्या शाळा कमी होण्याची शक्यता आहे. तर नवीन शाळांसाठी यावर्षी ही नोंदणी प्रक्रिया राबवावी लागणार आहे. शाळांची नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतरच आरटीई प्रवेशासांठी पुढील प्रक्रिया सुरु होणार नाही.