पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील 14 हजार 958 बालकांना लॉटरी लागली. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही पोर्टलचा वेग मंदावला होता व मंगळवारी सायंकाळपर्यंत पालकांना “एसएमएस’ही मिळाले नव्हते.
“आरटीई’अंतर्गत राज्यातील 9 हजार 86 शाळामध्ये 1 लाख 1 हजार 909 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या. या जागांसाठी यंदा 2 लाख 82 हजार 783 पालकांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. यात राज्यातील 90 हजार 688 बालकांचा नंबर लागला. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांचे शाळांमध्ये प्रवेश न झाल्यास व जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीत 69 हजार 859 बालकांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील 957 शाळांनी “आरटीई’ प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यासाठी 62 हजार 960 प्रवेशाच्या जागा असून याकरिता 62 हजार 960 पालकांनी अर्ज नोंदणी केली आहे. ठाण्यातील 10 हजार 429, नागपूरमधील 6 हजार 106, रायगडच्या 3 हजार 813, जळगावच्या 2 हजार 940, औरंगाबादच्या 4 हजार 193, अहमदनगरच्या 2 हजार 924 याप्रमाणे बालकांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे. पालकांनी मंगळवारी दिवसभर “एसएमएस’ची वाट पाहिली. मात्र
पालकांना “एसएमएस’ पाठविण्यातच आले नाहीत.