पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशाच्या जागांसाठी तीन दिवसांत 58 हजार 311 पालकांकडून ऑनलाइन नोंदणी झाली.
2020-21 या शैक्षणिक वर्षात करोनामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सतत कोलमडले होते.
पालकांकडून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसादही मिळत नव्हता. सोयीच्या व नामांकित शाळा प्रवेशासाठी न मिळाल्यामुळे पालकांनी प्रवेशाकडे पाठच फिरवली होती. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रियेच्या टप्प्यास सुरुवात झाली. एकूण 9 हजार 431 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यात 96 हजार 629 जागा दर्शविल्या आहेत.
प्रवेशासाठी “आरटीई’ पोर्टलवर 3 मार्चपासून सुविधा उपलब्ध झाली असून ती 21 मार्चपर्यंत राहणार आहे. यंदा ऑनलाइन अर्ज भरताना अद्याप अडचणी आलेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 985 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून 14 हजार 773 जागा दर्शविल्या आहेत. या जागांसाठी 16 हजार 867 पालकांकडून अर्ज भरण्यात आले आहेत.
नागपूरमधील 7 हजार 611, ठाणे जिल्ह्यातून 4 हजार 572, नाशिकमधून 3 हजार 599, औरंगाबादमधून 2 हजार 982, मुंबईतून 3 हजार 274 याप्रमाणे पालकांनी अर्ज भरले आहेत. सिंधुदुर्गमधून सर्वात कमी 35 एवढेच अर्ज दाखल झाले आहेत.