पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी प्रतिक्षा यादीतील पालकांनी निरुत्साह दाखविला आहे. यात बारा दिवसांत केवळ 2 हजार 753 पालकांनीच आपल्या मुलांचे शाळांमध्ये प्रत्यक्षात प्रवेश निश्चित केले.
प्रतिक्षा यादीत 75 हजार 465 मुलांचा समावेश केला होता. यातील प्रवेशासाठी 24 हजार 953 मुलांना पहिल्या टप्प्यात संधी देण्याचे नियोजन होते. शाळांमध्ये रिक्त जागांनुसार पालकांना “एसएमएस’द्वारे प्रवेशाचा दिनांक कळविण्यात आले. यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.
4 हजार 347 पालकांनी तात्पुरते प्रवेश केले आहेत. त्यातील काही जणांचेच प्रवेश निश्चित झाले. नियमित व प्रतिक्षा यादीतील मिळून एकूण 71 हजार 56 मुलांचे प्रवेश झाले असून अद्यापही 44 हजार 421 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.
पुणे जिल्ह्यात 281 मुलांचे तात्पुरते प्रवेश
पुणे जिल्ह्यात 972 शाळांमध्ये 16 हजार 950 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 62 हजार 919 जणांची निवड झाली होती. त्यात 11 हजार 149 मुलांचे प्रवेश झाले. प्रतिक्षा यादीतील प्रवेशासाठी 4 हजार 765 मुलांची निवड झाली आहे. त्यातील 281 मुलांचे तात्पुरते प्रवेश, तर 11 मुलांचे प्रवेश निश्चित झाले.