“आरटीई’ प्रवेश : दुसरी लॉटरी निघाली

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी दुसरी राज्यस्तरीय लॉटरी शनिवारी (दि.15) काढण्यात आली आहे. या लॉटरीद्वारे प्रवेशासाठी नव्याने सुमारे 35 हजार 276 जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

राज्यात 9 हजार 195 शाळांमध्ये एकूण 1 लाख 16 हजार 793 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 45 हजार 499 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 8 एप्रिल रोजी मोठा गाजावाजा करुन प्रवेशासाठी पहिली राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे 67 हजार 716 जागा प्रवेशासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यातील 47 हजार 35 जागांवर प्रवेश निश्‍चित झाले आहेत. उर्वरित 20 हजार 681 प्रवेशाच्या जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.

एनआयसीमार्फत “आरटीई’ पोर्टलवरील डेटा रन करुन राज्यस्तरीय दुसरी लॉटरी काढण्यात आली आहे. दुपारपासूनच जिल्हानिहाय प्रक्रिया सुरू करुन रात्री उशिरापर्यंत ती चालूच ठेवण्यात आली होती. 35 हजार 276 जागांसाठी दुसरी लॉटरी काढण्यात आली आहे. दुसरी लॉटरी लागलेल्या पालकांना “एसएमएस’ पाठविण्यासही त्वरीत सुरुवात करण्यात आली आहे. “एसएमएस’ न आल्यास पोर्टलवर अर्जनिहाय डिटेल्समध्ये अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे, की नाही याची पडताळणी पालकांना करता येणार आहे. लॉटरीत पाहिजे ती शाळा मिळालेल्या पालकांना आनंद झाला आहे, तर काहींमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. दुसरी लॉटरी लागलेल्यांना 17 ते 27 जूनदरम्यान शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात 963 शाळांमध्ये 5 हजार 495 जागा दुसऱ्या लॉटरीद्वारे उपलब्ध झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.