पुण्यात आरटी-पीसीआर टेस्ट किट संपल्या

बहुतांश खासगी लॅबमध्ये स्वॅब घेणे बंद : समस्या वाढली

पुणे – करोनाच्या “आरटी-पीसीआर’ टेस्टसाठी किटच उपलब्ध नसल्याने बहुतांश खासगी लॅबमध्ये स्वॅब घेणेच बंद करण्यात आले आहे. स्वॅबसाठी चौकशी केली, तर एका आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट दिली जात असल्याने, संशयित रुग्ण हवालदिल झाले आहेत.

करोनाच्या सुरूवातीला महापालिकेच्या माध्यमातूनच स्वॅब कलेक्‍शन केले जात होते आणि ते “एनआयव्ही’कडे पाठवले जात होते. मात्र, रुग्णसंख्या वेगाने वाढल्यानंतर महापालिकेची आणि “एनआयव्ही’ची क्षमता संपली. त्यामुळे खासगी पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना परवानगी देण्यात आली.
त्यांचे दरही निश्‍चित करण्यात आले. ते चार वेळा सरकारने कमीही केले. शहरात असलेल्या सुमारे 25 ते 30 लॅबमध्ये सध्या स्वॅब कलेक्‍शन आणि टेस्टिंग होते.

याठिकाणी आरटी-पीसीआर टेस्ट करून दिली जाते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अनेक लॅब चालकांनी टेस्ट होणार नसल्याचे सांगितले आहे. त्याविषयी चौकशी केली असता त्यांच्याकडील टेस्टकिट संपल्याचे सांगण्यात येत आहे. टेस्टिंगच होत नसल्याने स्वॅब घेऊन करायचे काय, त्यामुळे स्वॅब कलेक्‍शनच बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, आयुक्‍तांच्या यापूर्वीच्या आदेशानुसार जवळपास सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. पण, जर शहरातील टेस्ट किट संपल्या असतील तर त्यांच्या टेस्ट करणार, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिकेचे काम केवळ स्वॅब कलेक्‍शनचे असते. रोजचे सुमारे अडीच हजार स्वॅब घेतले जातात. त्यातील दोन हजार ससूनच्या प्रयोगशाळेत जातात. “आयसर’ आणि “एनआयव्ही’ यांच्याकडे प्रत्येकी अडीचशे तपासणीसाठी जातात.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका


शहरातील ज्या खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी होते, त्यांची दिवसाला चाचण्या करण्याची क्षमता जास्तीत जास्त 200 ते 300 इतकी आहे. मात्र, आता नमुन्यांची संख्या वाढल्याने सर्व प्रयोगशाळांना अतिरिक्त नमुन्यांचा भार पेलवेनासा झाला असल्याने त्या सध्या नवीन नमुने घेत नाहीत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने आता या प्रयोगशाळांना ऍन्टिजेन चाचणी करण्याची परवानगी द्यावी.
– डॉ. अपर्णा जोशी, सचिव, इंडियन असोसिएशन ऑफ प्रॅक्‍टिसिंग पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.