तिरुवनन्तपुरम – केरळ राज्यातील पलक्कड शहरातील आयुपल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजीत (वय, 27) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असल्याचे सांगण्यात येत असून भाजप पदाधिकाऱ्यांकडून एसडीपीआय या संघटनेच्या कार्यर्त्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नऊच्या सुमारास संजीत पत्नीसह घरातून दुचाकीवरून जात होता. त्यानंतर अचानक कारमधून आलेल्या 4 आरोपींनी संजीतला घेरले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून तेथून पळ काढला. घटनेनंतर संजीतला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र धारदार शस्त्राने 40 हून अधिक वार केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक पोलिस अधिक्षक यांनी एक विशेष पथक तयार केले असून आरोपींचा शोध सुरु आहे. असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वी संजीतचा एसडीपीआय संघटनेच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला होता.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये अलप्पुझा जिल्ह्यात एसडीपीआयच्या लोकांवर आरएसएस कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर हिंदू संघटनांनी केरळपासून दिल्लीपर्यंत निदर्शने केली. त्यानंतर अलप्पुझा येथे कलम 144 लागू करून एसडीपीआयशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली होती.