नवीन संविधान हा रा. स्व. संघाच्या बदनामीचा डाव

संघातर्फे पोलिसांत फिर्याद, संघाचा संविधानावर विश्‍वास असल्याचा दावा

नागपूर : नवीन संविधान वितरीत करून संघाला बदनाम करण्याचा डाव रचला असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. या बाबत त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

समाज माध्यमांत सध्या नवीन संविधान हे सरसंघचालकांचे छायाचित्र वापरून वितरीत केले जात आहे. त्याच्याशी संघाचा काहीही संबंध नाही. संघाचा देशाच्या संविधानावर पूर्ण विश्‍वास आहे आणि त्यांनी कोणत्याही नव्या घटनेचा प्रस्ताव ठेवलेला नाही. हा संघाला बदनाम करण्याचा कट आहे, असे संघाचे नेते श्रीधर गदगे यांनी सांगितले.

नया भारतीय संविधान असे लिहलेले आणि भागवत यांचे छायाचित्र असलेले 15 पानी पीडीएफ फाईल समाज माध्यामांदवारे वितरीत केली जात आहे, असे ते म्हणाले.

अशी कोणतीही पुस्तीका संघ अथवा सरसंघचालकांनी प्रकाशित केली नाही. या पिडीएफमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे. त्याचा संघाशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संघाने कोतवाली पोलिस चौकीत गुन्हा दाखल केली आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. यामागे कोणाचा हात आहे, याची आम्हाला कल्पना नाही म्हणून आम्ही पोलिसांत फिर्याद दाखल केली, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.