आता भाजपसाठी संघाची वारी ; स्वयंसेवक जाणार घरोघरी

मार्चपासून मोहिमेला प्रारंभ

नगर: लोकसभेच्या रणधुमाळीसाठी संघ आणि संघ परिवारातील संघटना कामाला लागल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारला जास्तीत जास्त पाठिंबा मिळवून देण्याच्या हेतूने या संघटना स्वतंत्रपणे देशव्यापी ‘डोअर टू डोअर’ प्रचाराची आघाडी सांभाळणार आहेत. मार्चपासून या जनसंपर्क अभियानाची सुरुवात होत आहे. नुकत्याच संघाच्या बैठकीत स्वयंसेवकांना तशा सुचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाजपच्या राजकीय भूमिकेत संघाचा हस्तक्षेप नसतो असे दोन्ही बाजूकडून वारंवार सांगितले जात असले तरी भाजप व मोदी सरकारमध्ये संघाचा हस्तक्षेप आता लपून राहिलेला नाही. सध्या देशपातळीवर संघ परिवारातील संघटनांच्या प्रांतनिहाय समन्वय बैठका सुरू आहेत. या बैठकीत संघ परिवारातील प्रमुख अशा 36 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीस संघाच्या प्रांत स्तरावरील अधिकाऱ्यांनी या देशव्यापी प्रचार अभियानाच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परिवारातील संघटनांकडून घरोघरी हे प्रचार अभियान राबवले जाणार आहे.या अभियानाची सुरुवात येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे भाजपच्या प्रचार अभियानाशी कुठलाही संबंध न राखता स्वतंत्रपणे हे अभियान चालवले जाणार आहे. केंद्रात मोदींचे सरकार पुन्हा येणे का आवश्‍यक आहे, हाच मुद्दा या अभियानातून घरोघरी मांडला जाणार आहे.

परिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेविका समिती, स्वदेशी जागरण मंच, वनवासी कल्याण आश्रम, मुस्लिम राष्ट्रीय मंच, राष्ट्रीय शीख संगत, भारतीय किसान संघासह प्रमुख संघटना या अभियानात सहभागी होणार आहेत. 2014 च्या निवडणुकीतही संघ परिवाराच्या वतीने याच पद्धतीचे अभियान राबवले गेले होते.

राममंदिर मुद्दा बाजूला, आता पुलवामाचा विषय

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जनमानस पेटून उठलेले असताना आगामी काळात देशात कणखर निर्णय घेणारे सरकार कसे आवश्‍यक आहे, या प्रमुख मुद्‌द्‌यांसह सरकारच्या उपलब्धींची मांडणी करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार असल्याचे संघ परिवारातील सूत्रांनी सांगितले. पुलवामा येथील घटनेपूर्वी राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावर घरोघरी संपर्क अभियान राबवण्याची संघ परिवाराची योजना होती. मात्र, आता पुलवामा येथील घटनेनंतर याच मुद्‌द्‌यावर मोदी सरकारच्या समर्थनात अभियानाचा निर्णय झाला, अशी माहिती संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

विरोधी विचारांच्या कुटुंबांवर स्वयंसेवक करणार फोकस

मोदी सरकारच्या समर्थनार्थ घरोघरी प्रचार करताना प्रामुख्याने संघाच्या विचारधारेशी संबंधित नसलेली घरे तसेच तटस्थ विचार बाळगून असलेल्या कुटुंबांशीच संपर्क साधण्याचे संघ परिवाराच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. या लोकांशी संवाद साधून त्यांना संघाची भूमिका पटवून देण्याचे लक्ष्य संघटनांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. केवळ एकदा नव्हे, तर आपले विचार पटेपर्यंत या कुटुंबांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवावा, अशा खास सूचनाही स्वयंसेवकांना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.