RSS- BJP Meeting। राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रोज नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या प्रमाणात मतांमध्ये घट झाली. एवढंच नाही तर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जागांसह अनेक जागांवर फटका बसला. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महायुती आणि घटकपक्ष सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली असून त्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांशी भाजपाची चर्चा चालू आहे.
विधानसभेसाठी बैठकांच्या माध्यमातून भाजपा आणि संघ परिवार यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर रणनीती आखण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल भाजपा आणि संघ परिवारातील वेगवेगळ्या 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या वतीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.
बैठकीत संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत भाजपची चर्चा RSS- BJP Meeting।
संघ परिवाराच्या दिवसभर चाललेल्या या समन्वय बैठकीत भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ते अखेरच्या सत्रात संध्याकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर भाजपाने विस्तृतपणे महाराष्ट्रातील परिस्थिती ठेवली आहे. या बैठकीत प्रामुख्याने 2019 साली भाजप आणि शिवसेना वेगवेगळे झाल्यानंतर कोणत्या परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सोबत घ्यावं लागलं याची राजकीय कारणमीमांसा करण्यात आली. 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं, तेव्हा भाजप सर्वांत मोठा पक्ष असतानाही भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी नव्हती परिस्थिती नव्हती, अशी चर्चा या बैठकीत झाली.
बैठकीतील प्रमुख मुद्दे RSS- BJP Meeting।
* भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याची स्थिती नसल्यामुळे आधी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आलं.तरी दोघांच्या मताची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नसल्याने अजित पवार यांनाही सोबत घेण्यात आलं.
* भाजपच्या अनेक कोअर मतदारांनातसेच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणे रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचे वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं
* लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवार यांना सोबत घेतल्याचा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला फार फायदा झालेला नाही
* लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मत एकनाथ शिंदे यांना 89% ट्रान्सफर झाले, तर शिंदेंचे 88% मते भाजपाला ट्रान्सफर झाले आहेत.
* भाजप आणि अजित पवार यांच्यामधील वोट ट्रान्सफरेबिलिटी मात्र 50% पेक्षा कमीच आहे.
* एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली आहे. 2019 ते 2022 दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना कामाचे सातत्य तुटले होते, ते पुन्हा सुरू करता आले आहे.
* लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपामधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचे आकलन केले. मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावे असे ठरले.
* भाजपाने बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख अशी निवडणुकीची लांबलचक यंत्रणा उभी केली होती. मात्र या यंत्रणेत महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्यामुळे भाजपाला फारसा फायदा झालेला नाही.
* लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून हे लक्षात आलंय की सध्याच्या काळात उमेदवार अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपाचे जेवढे ही खासदार जिंकून आले त्यापैकी नितीन गडकरी आणि रक्षा खडसे सोडून इतर सर्व नवे उमेदवार होते. तर ज्या ठिकाणी उमेदवार बदलले गेले नाही आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली तेथे भाजपाचा पराभव झालेला आहे.
* विरोधकांनी खोट्या नरेटिव्हच्या जोरावर लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात जिंकली. त्यामुळे खोट्या नरेटिव्हच्या जोरावर ते राज्य सरकारला हलवू शकतात, विधानसभा निवडणूक जिंकू शकतात, असे त्यांना वाटते. त्यामुळे रोज खोटारडेपणा सुरू आहे.
* मात्र अशा खोट्या नरेटीव्हला संघ परिवाराचा विस्तृत विचार परिवार सहज पराभूत करू शकतो. त्यासाठी सर्वांनी सक्रियतेने मैदानात उतरण्याची गरज आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.