रासप विधानसभा स्वबळावर लढवणार

महादेव जानकरांचा निर्धार

सदाभाऊ खोत कमळावर कायम

मुंबई – महायुतीतील घटक पक्ष आणि भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवण्याचा निर्धार पशूसंवर्धन मंत्री व रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. रासपला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळावा, तसेच कार्यकर्ते पक्षासोबत कायम जोडून राहावेत यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रासप भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तर रयत क्रांती संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या कमळावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर भाजपने आतापासूनच विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच भाजप-शिवसेना हे प्रत्येकी 135-135 जागांवर लढतील व उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या जागावाटपाच्या फॉम्रयुल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

मित्रपक्षांना सोडल्या जाणाऱ्या संभाव्य जागांवर भाजप कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्यास भाग पाडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते व मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपण कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू, असे म्हटले आहे. मात्र, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिलेल्या मंत्री महादेव जानकर यांना पत्रकारांनी याबाबत छेडले असता त्यांनी आपला स्वतंत्र स्वाभिमानी बाणा दाखवत माझा पक्ष छोटा असला तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे रासप पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढेल, हे स्पष्ट केले.

2014 साली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली होती. त्यावेळी भाजपने आठवले, जानकर, राजू शेट्टी व विनायक मेटेंना सोबत घेत युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी जानकर, आठवले व राजू शेट्टी यांनी आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. मात्र, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

मात्र, जानकरांच्या रासपचा एक उमेदवार सोडता मित्रपक्षांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. कमळावर निवडणूक लढविलेले मेटे यांचा जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून केवळ पाच हजार मतांनी पराभव झाला होता तर त्यांच्या संघटनेच्या भारती लव्हेकर कमळाच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या.

रासपचे दौंडचे उमेदवार राहुल कुल कपबशी चिन्हावर निवडून आले. तर आठवलेंच्या पक्षाचा भोपळाही फुटला नव्हता. त्यामुळे मित्रपक्षांनी कमळावर निवडणूक लढवावी यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर जिंकण्याची शक्‍यता जास्त असे भाजपचे म्हणणे असले तरी शिवसेनेपेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर जास्तीत जास्त आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखता येईल अशी व्यूहरचना भाजपा आखत असल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.