रासप पूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार

आमदार राहुल कुल यांना निवेदन सुपूर्द

दौंड -राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) पूर्ण ताकदीने दौंड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे निवेदन रासपच्या वतीने देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा मतदारासघांच्या निवडणुकीत रासपला महायुतीमध्ये 3 जागा सोडण्यात आल्या होत्या; परंतु काही कारणास्तव जिंतूर व दौंड या ठिकाणी भाजपने आपला एबी फॉर्म दिल्याने रासपच्या गोटात रोष दिसून येत आहे; परंतु रासपचे संस्थापक अध्यक्ष व मंत्री महादेव जानकर यांनी राज्यात आम्ही महायुती बरोबर असल्याचे सांगितले. शिवाय गंगाखेड वगळता दौंड आणि जिंतूर ही जागा रासपची नाही, असे ते म्हणाले आहेत.

भाजपच्या किचकट अटींमुळे व वेळ निघून गेल्याने स्वच्छ भावनेतून काही अटी ठेवून महायुतीचा धर्म पाळला जाणार आहे. त्या अटी पुढीलप्रमाण- रासपचे महायुती मधील अस्तित्व स्वतंत्र आणि मानाचे असावे, पुढील सर्व निवडणुकांमध्ये राजकीय भागीदारी मिळावी, कोअर कमिटी निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे, विशेषतः धनगर व इतर तत्सम जातीतील बहुजन वर्गातील वंचित घटकांना न्यायाची भूमिका घ्यावी, तसेच भाजपच्या या कृतीमुळे रासप तालुक्‍यात पाच वर्षे मागे गेल्याचे ही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रासपचे जिल्हा अध्यक्ष हरीश खोमणे, तानाजी केकान, अमोल मारकड, विशाल खताळ यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.