बाळासाहेब दोडतले : आगामी निवडणुकीत पक्ष भाजपासोबतच
बारामती – आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) भाजपा बरोबर असून राज्यभरात 52 जागांची मागणी केली असून जिल्ह्यातील दौंड, बारामतीसह इंदापूरच्या जागेवर रासपने दावा केला असल्याची माहिती रासपचे महासचिव तथा शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली.
राष्ट्रीय समाज पक्षाचा रविवारी (दि. 25) 16 वा वर्धापनदिन आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर पक्षाच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने रासपचे सर्व पदाधिकारी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना बारामती येथे दोडतले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माणिकराव दांगडेपाटील, जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, तालुकाध्यक्ष अमोल, माळेगाव कारखान्याचे संचालक विलास देवकाते, शैलेश थोरात, विठ्ठल देवकाते, काका बुरुंगले, प्रमोद देवकाते, अविनाश मासाळ, दत्ता ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. दोडतले म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष भाजपबरोबर महायुतीत राहणार आहे. 2014 च्या तुलनेत पक्षाचे संघटन राज्याचे सर्व विभागात विस्तारले असल्याचे दोडतले यांनी यावेळी स्पष्ट केले.
52 जागांची केली मागणी
पक्षाचे 92 जिल्हा परिषद सदस्य आहेत. 3 पंचायत समिती सभापती, 2 नगराध्यक्ष, 26 नगरसेवक, 2 आमदार व एक मंत्री असा पक्षाचा सत्ता सहभाग आहे. मागील निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या पाच जागा कायम असल्याची ग्वाही भाजपाने दिली आहे. राज्यभरात 52 जागांची मागणी रासपने भाजपाकडे केली आहे. याबाबतची पहिली बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झाली असल्याचे बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.