पुणे – आई-वडील, आजी यांच्याकडून वर्षभर घेतलेले आणि नातेवाईकांनी खाऊसाठी दिलेले पैसे वाढदिवसादिवशी गिफ्ट घ्यायचे म्हणून चिमुकलीने पिग्गीमध्ये वर्षभर साठवले. 1 मे रोजी तिचा पाचवा वाढदिवस आहे.
मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत घरच्यांनी समजवल्यानंतर तिने ते पैसे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्य निधीला देण्याचे मान्य केले. त्यानुसारच पिग्गीत निघालेले 5 हजार दोनशे रुपये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्य निधीला प्रत्येकी 2600 ऑनलाइन पाठविण्यात आले.
त्रिषा पायगुडे असे या चिमुकलीचे नाव असून, ती बालेवाडी येथील कंनफोर्ट झोन सोसायटी येथे राबत असून, वाकड येथील विद्या व्हॅली वर्ल्ड स्कूल येथे शिकत आहे. तिचे आई-वडील ऍड. अनिरुध्द पायगुडे आणि ऍड. वृषाली पायगुडे दोघेही वकील आहेत. शिवाजीनगर येथील न्यायालयात प्रॅक्टिस करतात. याविषयी अनिरुद्ध पायगुडे म्हणाले, देशात निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांना गुजराण करणे अवघड झाले आहे. दोन वेळचे जेवण मिळणेही कित्येकांना कठीण झाले आहे.
आम्ही मात्र त्या मानाने सुखी आहे. चांगले जीवन जगत आहोत. त्यामुळे वाढदिवसासाठी साचवलेले पैसे आपण देशाच्या हितासाठी वापरू असे मी त्रिशाला सांगितले. सुरुवातीला तिने पैसे देण्याचे नकार दिला.
गिफ्ट घेण्याबाबत ती आग्रही होती. मात्र, सर्व परिस्थिती समजावल्यानंतर ती देखील तयार झाली. यापुढे तिने वर्षभर पिग्गीत साठवलेले पैसे लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेला तिला समजावून सांगून देत जाणार आहे.