सातारा – ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यामुळे पर्यटक आणि सातारकरांची मोठी गैरसोय होत होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही गैरसोय दूर झाली असून किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून तब्बल पाच कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे पर्यटक आणि खास करून सकाळी व सायंकाळी किल्ल्यावर चालण्यासाठी जाणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
सर्वांचाच त्रास दूर करण्यासाठी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून अजिंक्यतारा किल्याच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व सुधारणा करण्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भरीव निधी उपलब्ध झाल्याने किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. तातडीने निविदा प्रक्रिया व इतर सोपस्कार पूर्ण करून काम त्वरित सुरु करावे, काम दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.