अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार

मुंबई: अक्कलकोट  नगर परिषदेच्या  इमारत बांधकामासाठी 13 कोटी, येथे येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगसाठी 3 कोटी रु, शौचालय बांधकामांसाठी 3 कोटी रुपये आणि गार्डन विकासासाठी  1 कोटी रुपये असे मिळून 20 कोटी रुपये नगर विकास विभागाला  दिले जातील  असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काल अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते.

या सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश देऊन सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सोलापूर जिल्हाधिकारी यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा. पालखी मार्ग मोठा करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी संवाद साधून रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेतल्या जाव्यात.

अक्कलकोट तीर्थक्षेत्राला वर्षभर भाविक भेट देत असतात.  हे लक्षात घेऊन येथील पाणीपुरवठा  शाश्वत करण्यासाठी कायमस्वरूपी जलस्रोताचा शोध घेण्यात येईल. पाणीपुरवठा मंत्री या सबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेऊन योजनेची निश्चिती करतील. योजना निश्चित झाली की त्यास आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. भूमिगत नाले आणि वीज वाहिन्यांच्या कामासाठी जीवन प्राधिकरण आणि ऊर्जा विभागाचे सहकार्य घेण्यात यावे. हे काम झाल्याशिवाय रस्त्यांची कामे केली जाऊ नयेत असे ही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. अक्कलकोटचे बस स्टँड एस टी महामंडळाने त्यांच्या बस स्थानकांच्या नूतनीकरण कार्यक्रमात समाविष्ट करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी 166 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. यातील कामाचे प्राधान्यक्रम निश्चित केले जावेत, असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.